नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
शेल्टर असोसिएट्स तर्फे भीमनगर येथे जागतिक शौचालय दिन साजरा
खारघर : शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी संस्था तर्फे घणसोली विभाग कार्यालय अंतर्गत येणाऱ्या भीमनगर, गौतमनगर झोपडपट्टी वसाहतीमध्ये बांधून देण्यात आलेल्या एक हजार दोनशे शौचालयांचे उदघाटन करुन ‘जागतिक शौचालय दिन' २७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनवणे, स्वच्छता निरीक्षक मिलिंद दौडा, महेंद्र महाडिक, विजय चौधरी, सरिता सलदार, ‘शेल्टर असोसिएट्स'चे प्रकल्प व्यवस्थापक अमोल गाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रतीक बनसोडे, अरविंद राठोड, सुनीता सकुंडे, मनीषा सुर्वे, शीतल बनसोडे, राधिका बनसोडे आदी उपस्थित होते.
शेल्टर असोसिएटस शहरातील गरीब नागरिकांचे आयुष्यमान सुधारावे या उद्देशाने स्वच्छता आणि आरोग्य विषयावर काम करीत आहे. शेल्टर असोसिएट्स तर्फे ठाणे, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, कोल्हापूर या शहरातील झोपडपट्टी भागात तीस हजार पेक्षा जास्त कुटुंबांसाठी शौचालय बांधून देण्यात आली आहेत. याशिवाय शेल्टर असोसिएट्स मार्फत नवी मुंबई परिसरातील विविध झोपडपट्टी वसाहत मधील ४ हजार २०० कुटुंबाच्या घरात वैयक्तिक शौचालय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. घणसोली विभागातील गौतमनगर, रबाळे या वस्ती मध्ये शेल्टर असोसिएट्स तर्फे १ हजार २०० शौचालय बांधून देण्यात आली आहेत. या शौचालयांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करुन शेल्टर असोसिएट्स तर्फे जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात गौतमनगर वस्ती परिसरात साफसफाई करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. शेल्टर असोसिएट्स मार्फत सुरु असलेल्या शौचालय उभारणीच्या कामाचे यावेळी डॉ. गौतमी सोनवणे यांनी कौतुक केले. नागरिकांनी आपले घर आणि परिसरातील शौचालय स्वच्छ आणि चांगले रहावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी डॉ. गौतमी सोनवणे यांनी गौतमनगर मधील रहिवाशांना केले.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    