आरटीओ, शालेय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भिवंडी : भिवंडीतील जवळपास सर्वच शाळांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून अप्रशिक्षित चालकांकडून शालेय बस चालवल्या जात आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी शहरातील गैबीनगरमध्ये झालेल्या स्कुल बसच्या अपघातात वृध्द महिलेचा मृत्यू झाला. सदरची घटना होऊन देखील ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि स्थानिक वाहतूक विभागाचे पोलीस मात्र स्कुल बसवर कारवाई करण्याबाबत उदासीन राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी असुरक्षित असल्याची भावना पालकांमध्ये बळावली असून त्यांच्यामध्ये असंतोष पसरला आहे.

भिवंडी शहर आणि परिसरात इंग्रजी माध्यमांसह विविध भाषांच्या शाळा असून, अनेक मोठ्या शाळा आपल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी ठेकेदारामार्फत बसेस चालवतात. शहरात किरकोळ पावसातही पाणी तुंबते. त्यामुळे पालकवर्ग मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसद्वारे मुलांना पाठवितात. मात्र, शालेय बसचे बहुतांश ठेकेदार कमी वेतन घेणाऱ्या विनापरवाना आणि अप्रशिक्षित चालकांना बस चालविण्यास देतात. त्यामुळे निष्पाप मुलांचा जीव धोक्यात येत आहे. तर अनेक वाहतूकदार ‘आरटीओ'कडून फिटनेस प्रमाणपत्र न घेताच बसेस चालवत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

स्कुल बस चालक वाहतुकीच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करताना दिसत नाही. अनेकवेळा वाहकांची विद्यार्थ्यांशी गैरवर्तणूक करण्याच्या तक्रारी पालक वर्गांकडून होतात. शाळांना सुट्टी लागल्यानंतर अनेक बस वाहतूकदार आपली बसचा रंग बदलूनही ग्रामीण भागातील गोदाम मधील कामगारांची ने-आण करतात. आश्चर्याची बाब म्हणजे अशाप्रकारे बेकायदेशीरपणे धावणाऱ्या बसेसवर कारवाई करण्यात वाहतूक पोलीस पूर्णपणे उदासीन दिसत आहेत. यासंदर्भात ठाणे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, भिवंडीच्या ग्रामीण भागातील न्यू इरा स्कुलची बस (क्रमांक एमएच ४३ एच १६१०) विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असतानाच गैबीनगर परिसरात या बसने गुलजार नगर येथील झुबेदा गुलशन (६३) या महिलेला चिरडल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर शांतीनगर पोलिसांनी बस चालक इरफान हैदर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. यावेळी बस चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा बस चालकाच्या हातात बस चालविण्यास देऊन निरागस मुलांच्या जीवाशी खेळ केला म्हणून शालेय व्यवस्थापन आणि बस ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

शांतीनगर रोडवरील स्कुल बस अपघाताची चौकशी सुरू केली आहे. वाहतुकीचे नियम डावलून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कल बस आणि खाजगी वाहनांची चौकशी करन त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल.
-सुधाकर खोत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-भिवंडी शहर वाहतूक विभाग. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीएनजी दरात वाढ झाल्याने रिक्षा मीटरमध्ये वाढ मिळण्याची मागणी