नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई
नवी मुंबई : ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई' अशी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचून एकल वापर प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत असून दुसऱ्या बाजुला प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करुन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार दिवाळीच्या आधीपासूनच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली असून नोव्हेंबर महिन्यात २५ दुकाने, आस्थापना यांच्यावर कारवाई करीत ६२.१०० किलोग्रॅम एकल प्लास्टिक जप्त करुन संबंधितांकडून १.६० लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये बेलापूर विभागातील १८ दुकाने-आस्थापनांकडून ४२ किलो, नेरुळमधील एका दुकानातून १.५ किलो, वाशी मध्ये एका दुकानदाराकडून १ किलो, कोपरखैरणे विभागात १ दुकानदाराकडून ५०० ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले. याशिवाय परिमंडळ-१ मधील भरारी पथकाने १५ किलो तर परिमंडळ-२ मधील भरारी पथकाने ३ दुकानदारांकडून २.१०० किलोग्रॅम प्लास्टिक साठा जप्त केला आहे. अशाप्रकारे नोव्हेंबर महिन्यात नमुंमपा क्षेत्रात ६२.१०० किलोग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
प्लास्टिकमुळे निर्सगाला अणि मानवी जीवनाला होणारी हानी लक्षात घेऊन नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या आणि एकल वापर प्लास्टिकला दैनंदिन वापरातून पूर्णपणे हद्दपार करावे. स्वच्छ सुंदर पर्यावरणशील शहर असा नवी मुंबईचा नावलौकिक वृध्दींगत करत रहावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    