नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
एपीएमसी फळ बाजारात आफ्रिकन मलावी आंबा दाखल
वाशी : दरवर्षी प्रमाणे यंदा देखील आफ्रिकन मलावी हापूस आंबा वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात २८ नोव्हेंबर रोजी दाखल झाला आहे. एपीएमसी फळ बाजारात सध्या १२१५ खोके मलावी हापूस आंबा दाखल झाला असून, प्रती खोका ३,००० ते ५,००० रुपये दर आहे. मलावी हापूस आणि टॉमी अटकिन्स आदी दोन प्रकारात मलावी हापूस आंबा दाखल झाला असून, मागील वर्षीपेक्षा तुलनेने यंदा या आंब्याचे दर कमी आहेत.
कोकणातील हापूस आंब्याची ओढ सर्वांनाच असते. कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम दरवर्षी मार्च महिन्यात सुरु होतो. मात्र, मागील काही वर्षांपासून कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच नोव्हेंबर महिन्यामध्ये परदेशी आंबे एपीएमसी फळ बाजारात दाखल होत आहेत. कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच परदेशी हापूस आंब्याची चव, रंग, सुगंध असल्याने खवय्यांना आंबा चाखण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. मलावी मधील ६०० हेक्टर जमिनीवर या मलावी हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. १३ वर्षांपूर्वी रत्नागिरी मधून ४० हजार हापूस आंब्याच्या काड्या मलावी मध्ये नेण्यात आल्या होत्या. मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण, दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली झाली असून, मोठ्या प्रमाणत आंब्याचे उत्पादन होते. यंदा देखील आफ्रिकन मलावी आंब्याची पहिली खेप वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली आहे.
२८ नोव्हेंबर रोजी ९४५ मलावी हापूस आणि २७० टॉमी अटकिन्स असे १२१५ खोक्यांची (बॉक्स) पहिली खेप वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली असून, त्यास ३,००० ते ५,००० रुपये दर आकार आणि दर्जानुसार भेटत आहे. टॉमी अटकिन्स आंब्याला ३,००० रुपये प्रतिखोका भाव भेटत आहे. एका खोक्यात सरासरी १० ते १४ आंबे बसत आहेत. मागील वर्षी या आंब्याला ४,५०० ते ५,५०० रुपये प्रति खोका किंमत मिळाली होती. त्यामुळे यंदा तुलनेने मलावी हापूस आंबे स्वस्त असून, पुढील दोन-तीन महिने अफ्रिकन हापूस आंब्याची एपीएमसी फळ बाजारात आवक सुरु राहणार आहे, अशी माहिती ‘एपीएमसी फळ मार्केट'चे संचालक संजय पानसरे यांनी दिली.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    