विवाह संस्काराचा इव्हेन्ट बनतो आहे का?

विवाह हा एक धार्मिक संस्कार आहेत ज्याचे जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे त्या विधीतील धार्मिकता जपणे अत्यंत महत्वाचे आहे, गेल्या काही वर्षांत मात्र या संस्कारात धार्मिक बाबींना दुय्यम स्थान दिले जाऊन अवडंबराला अधिक महत्व प्राप्त होऊ लागले आहे. अनेक अनिष्ट बाबींचा यात समावेश होऊ लागला आहे. ज्यामुळे विवाहसुद्धा एक इव्हेन्ट बनू लागला आहे.

तुळशी विवाह लागले की लगीनसराई सुरु होते. यंदाही विवाहांना सुरुवात झाली आहे. साड्यांच्या दुकानात गर्दी दिसू लागली आहे. घरी लग्नपत्रिका येऊ लागल्या आहेत. व्हाट्‌सअपच्या स्टेटसना निमंत्रणाचे इमेजेस आणि व्हिडीओ दिसू लागले आहेत. प्रतिदिन कुठे ना कुठे बेंडबाजा किंवा डीजेचे आवाज कानी पडू लागले आहेत. हळदी आणि विवाहाची गाणी वाजू लागली आहेत.

हिंदू धर्मात १६ संस्कारांपैकी पाणिग्रहण म्हणजेच विवाह संस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. ब्रह्मचर्याश्रमांतून गृहस्थाश्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जो संस्कार केला जात असे त्यालाच पूर्वी विवाह संस्कार म्हटले जात असे. आजही गृहस्थाश्रमाला म्हणजेच संसाराला सुरुवात करण्यातील आरंभीचा टप्पा म्हणून विवाह संस्काराचे महत्व अबाधित आहे. देव, अग्नी आणि ब्राह्मण यांच्या साक्षीने हा विवाह संस्कार पार पडतो. विवाह संस्कारामध्ये श्री गणेश पूजन, सीमांतपूजन, मधुपर्कपूजन, गौरीहरपूजन, कन्यादान, मंगळसूत्र बंधन, अक्षतारोपण, मंगलाष्टके, विवाह होम, पाणिग्रहण, लाजाहोम, सप्तपदी, गर्भाधान असे अनेक विधी असतात. या प्रत्येक विधीच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र, केल्या जाणाऱ्या कृती यामागे ऋषीमुनींचा संकल्प कार्यरत असतो, त्यामुळे या विधी भावपूर्ण होणे अत्यंत महत्वाचे असते. विवाह संस्कार म्हणजे उभयतांना केवळ सहचर्य करण्याची अनुमती देणारा संस्कार नसून भावी जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची सांगड घालण्याची शिकवण देणारा संस्कार आहे. विवाहसंस्कारात  नियोजित विधींना अधिक महत्व देण्यात आले आहे. सध्याच्या घडीला विवाहातील धार्मिक विधींपेक्षा अन्य गोष्टींना आणि कृत्रिम अवडंबराला अधिक महत्व प्राप्त होऊ लागले आहे. विवाह संस्कारात अनेक अनिष्ट बाबींचा शिरकाव झाला आहे, ज्यामुळे विवाहातील मुख्य विधींनाच बगल दिली जात आहे. विवाहासारख्या धार्मिक कार्यक्रमाचाही इव्हेन्ट होऊ लागला आहे, ज्यामुळे त्यातील सात्विकताच लोप पावू लागली आहे.

विवाह जुळवण्यासाठी हुंडा देणे आणि घेणे दोन्हीही भारतीय दंडविधानानुसार गंभीर गुन्हे आहेत. तरीही देशातील अनेक भागांत आजही हुंडा दिला आणि घेतला जात आहे. या हुंड्याच्या लोभामुळे दरवर्षी कितीतरी नववधूंचा छळ केला जातो. त्यापैकी कितीतरी जणी या छळाला कंटाळून आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारतात. व्हाट्‌स अप आणि टेलिग्रामच्या दुनियेतेतही आज महागड्या लग्नपत्रिका छापल्या जातात. लग्न पार पडल्यानंतर खरेतर पत्रिकेला काहीच महत्व उरत नाही, तरीही केवळ आपली पत दाखवण्यासाठी काही ठिकाणी महागड्या पत्रिका छापल्या जातात. विवाहाचे बॅनर्स आणि होर्डिंग्स लावण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून रूढ होत चालली असून यावरही अवास्तव खर्च केला जात आहे. विवाहासाठी निश्चित केलेल्या मुहूर्तावर विवाह लागणे, अत्यंत महत्वाचे आहे, पुरोहितांकडून मुहूर्ताच्या वेळी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी देवतांना उपस्थित राहण्यास आवाहन केले जात असल्याने मुहूर्ताला देवता सूक्ष्मरूपाने येतात, असा लोकांचा समज आहे. त्यामुळे पूर्वी मुहूर्तावर विवाह लागण्यासाठी आधीपासूनच सर्व सिद्धता केली जात असे. आजमितीला विवाहाच्या मुहूर्तापेक्षा जवळच्या नातेवाईकांची उपस्थिती आणि वधू-वरांचा मेक अप यांना अधिक महत्व दिले जाते. त्यासाठी विवाह रोखून धरला जातो. अनेक जण लग्न लागल्यानंतर स्वागत समारंभाची आणि भोजनाची वेळ पाळून विवाहाला उपस्थित राहतात. पूर्वी लग्नाची मंगलाष्टके म्हणण्यात चढाओढ लागत असे. एक मंगलाष्टक संपले कि दुसरे मंगलाष्टक म्हणण्याची संधी साधण्यासाठी उपस्थितांकडून धडपड केली जात असे. हल्ली काही विवाह सोहळ्यांना तर केवळ मंगलाष्टके म्हणण्यासाठी वाद्यवृंद आणि गायक बोलावले जातात. त्यासाठी वेगळा खर्च केला जातो. वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार घालून झाल्यावर त्यांच्या मस्तकावर अक्षता वाहण्याची पद्धत आहे; मात्र अनेक जणांना याविषयी पुरेशी माहिती नसल्याने मंगलाष्टके म्हणतानाच अक्षता उधळल्या जातात. परिणामी अक्षता वधू वरांच्या मस्तकावर न पडता कार्यक्रमस्थळी सर्वत्र  विखुरल्या जातात. अशा ठिकाणी वावरताना त्या पायाखाली येतात. यामध्ये अक्षतांची नासाडीही होते आणि अवमानही होतो. वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घालणे हा विवाहातील एक महत्वाचा क्षण असतो. त्यालाही मनोरंजक करण्यासाठी हल्ली  वधू-वरांना उगाचच उंचावर उचलून सहजपणे हार न घालू न देण्यासाठी आटापिटा केला जातो. ज्यामुळे त्यातील धार्मिकता निघून जाऊन तो केवळ मनोरंजनाचा क्षण बनतो. स्वागत समारंभासाठी परिधान करण्यात येणारे हिंदू वधु-वरांचे कपडेही हल्ली पाश्चात्य पद्धतीने शिवण्याची प्रथा पडू लागली आहे. त्यामुळे सकृतदर्शनी विवाह ख्रिश्चनांचा आहे की हिंदूंचा हा उपस्थितांनाही प्रश्न पडतो.

हल्ली विवाह विधी पार पडल्यानंतर सर्वांना एकत्र गोळा करून त्यांच्या समक्ष वधु-वरांकडून महागडा केक कापला जातो. हिंदू धर्मात शिजलेल्या अन्नपदार्थांवर सूरी फिरवणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे विवाहासारख्या सात्विक कार्यक्रमामध्ये अशी असात्त्विक कृती करणे अयोग्यच म्हणावे लागेल. हल्ली लग्नाच्या सिद्धतेसाठी अधिक वेळ द्यायला नको म्हणून इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीला लाखो रुपये देऊन कंत्राट दिले जाते. ही कंपनी विवाहातील धार्मिक विधींना अधिक महत्व न देता सोहळा अधिकाधिक मनोरंजक आणि आकर्षक कसा होईल याकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे अनेक ठिकाणी धार्मिक विधी चालू असताना दुसरीकडे सिनेसंगीत चालू असते. त्यामुळे उपस्थितांचे अधिक लक्ष त्याकडेच जाते. विवाह विधी सुरु असताना जी शांतता अपेक्षित असते ती न पाळता सर्वत्र गोंगाटाचे वातावरण असते. आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी याच कंपन्यांकडून वधु-वरांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे सिनेगीतांवर नृत्य बसवले जातात, विवाह विधीनंतर त्याचे विशेष सादरीकरण असते. स्टेजवर लोकांसमोर नाचायचे आहे, तर सर्व व्यवस्थितच व्हायला हवे यासाठी अनेक जवळचे नातेवाईक लग्नाच्या तयारीत हातभार लावण्यापेक्षा या नृत्याच्या तयारीतच अधिक व्यस्त असतात. विवाह विधी हा वर आणि वधु या दोहोंच्या नातेवाईकांसाठी आनंदाचा विधी असतो, त्यामुळे विवाहाप्रित्यर्थ उपस्थितांना प्रीती भोजन दिले जाते. हे भोजन वधु वरांच्या कुटुंबाच्या ऐपतीनुसार दिले जायला हवे; मात्र इथेही आत्त्मप्रौढीसाठी भोजनात नको तितक्या पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. काही ठिकाणी भोजनासाठी शाकाहार आणि मांसाहार असे वेगवेगळे कक्ष उभारले जातात. याशिवाय चायनीज, इटालियन पदार्थांचे कक्ष उभारण्याचीही पद्धत हल्ली रूढ होत चालली आहे. शहरी भागांत भोजनासाठी सर्रास ‘बुफे' पद्धत अवलंबली जाते, ज्यामध्ये आपले ताट स्वतःहून वाढून घ्यायचे असते. बऱ्याचदा उपस्थित मंडळी आपल्या भुकेचा अंदाज न घेता केवळ समोर ठेवले आहेत म्हणून नको तितके पदार्थ ताटात वाढून घेतात आणि संपवता न आल्याने त्यातील काही पदार्थ ताटातच अर्धवट खाऊन सोडून देतात. दरवर्षी लगीन सराईमध्ये असे कितीतरी टन अन्न केवळ ताटात अर्धवट सोडून दिल्यामुळे वाया जाते. आज भारतात असाही वर्ग आहे ज्यांना प्रतिदिन २ वेळचे पोटभर अन्न मिळणे दुरापास्त आहे. अशा भारतात जेवण ताटात सोडून वाया घालवणे म्हणजे अन्नदेवतेचा अवमान नव्हे का ? अशा प्रसंगी भोजनाकरीता भारतीय पंगत अधिक योग्य ठरते; मात्र तिलाच आज ‘आऊटडेटेड' ठरवण्यात आले आहे. विवाहानंतर मंजुळ आवाजाच्या पारंपरिक वाद्यांनीशी वधु-वरांची वरात काढण्याची प्रथा लोप पावत चालली आहे. हल्ली वरातीसाठी डीजे, बेण्डबाजा आणि कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीसाठी हजारो रुपये उधळले जातात. याशिवाय मित्र मंडळींना मद्याच्या आणि मांसाहाराच्या मेजवान्या देण्यासाठी खर्च होतो तो वेगळाच. विवाह सोहळा म्हणजे खरेतर वधु-वरांचा उत्सव, मात्र त्यातही हल्ली नातेवाईकांचे मानापमान नाट्य पाहायला मिळते. वर किंवा वधूच्या आईवडिलांनी मनासारखे कपडे किंवा दागिने घेतले नाहीत, पत्रिकेत नाव टाकले नाही म्हणून ऐन लग्नातही नातेवाईकांचे रुसवे फुगवे सुरु असतात. यांचा मान राखण्यासाठी पुन्हा वेगळा खर्च केला जातो.  

लग्न सोहळ्यासाठी खरेतर आपल्या ऐपतीप्रमाणेच खर्च केला जावा; मात्र ‘लोकांना काय वाटेल' या विचाराने वर-वधूच्या कुटुंबियांकडून लग्न सोहळा दिमाखात पार पडावा यासाठी कर्ज काढून नको त्या गोष्टीसाठी नको तेव्हढा खर्च केला जातो. त्यामुळे विवाह संस्कारातील धार्मिक विधी राहतात बाजूला आणि अनावश्यक बाबींसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. लग्नानंतर गृहस्थाश्रम आरंभ होतो. नवा संसार उभा करण्यासाठी जागोजागी धनाची निकड भासते; मात्र वधु-वरांची सुरुवातीची काही वर्षे लग्नासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यातच व्यय होतात. विवाह संस्कारामध्ये केवळ धार्मिक विधींना महत्व असून आपल्या इभ्रतीखातर त्याला लावण्यात आलेल्या उपरोक्त बाबींचा मुलामा निव्वळ दिखाव्यासाठी असतो. पूर्वी अनोळखी व्यक्तींसोबत विवाह संस्कार करून केलेले विवाहही पुढे आयुष्यभर टिकून राहात असत, त्यामुळे घटस्फोट नावाचा प्रकार त्यावेळी अस्तित्वातच नव्हता. ‘घटस्फोट' हा शब्दही केवळ पती पत्नीमधील नाते संपवण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारा शब्द आहे. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात या किंवा अशा अर्थाच्या कोणत्याच शब्दाचा उल्लेख नाही. हल्ली घटस्फोटांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. यामागे अनेक कारणे असली तरी विवाह संस्कारांना दिले जाणारे दुय्यम महत्व याचाही इथे उल्लेख करावासा वाटतो. लोकांना, नातेवाईकांना काय वाटेल या विचाराने आपण कर्जबाजारी होऊन लग्न सोहळे साजरे करत असू तर हेच लोक नंतरही आपल्याला नावे ठेवणारच आहेत हे लक्षात घ्यायला हवे. विवाह संस्कारांत शिरलेल्या अनिष्ट प्रथांचे समूळ उच्चाटन झाले की त्यासाठी केला जाणारा अवास्तव खर्चही वाचेल. यासाठी सर्वानीच पुढाकार घेऊन विवाह संस्कारात परंपरागत विधींना प्राधान्य द्यायला हवे.
-जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आठवण विदेशी पाहुण्यांची...