आठवण विदेशी पाहुण्यांची...

विदेशी पाहुणे म्हटलं की, आपल्याला आठवतात ते ठराविक सीझनमध्ये हजारो मैलांचा प्रवास करुन येणारे पक्षी, त्यांचं दरवर्षी त्याच जागेतलं वास्तव्य आणि काही काळानंतर निघून जाणं वगैरे वगैरे. पण मी मात्र आज जी आठवण सांगणार आहे ती पक्षांची नाही; तर माणसांची ज्यांना आपण सहजपणे ‘फॉरेनर्स' असं म्हणतो.

थळ येथील आर सी एफ चा प्रकल्प सुरू होऊनही आता खूप कालावधी उलटून गेलाय. परंतु त्या प्रकल्पाची सुरुवात होण्यापूर्वी अनेक अडचणी, वादविवाद, राजकीय वादंग, स्थानिकांची आंदोलनं, पुढा-यांची सावध भूमिका आणि पुढील फायद्याची तरतूद वगैरे बरंच काही होऊनही शेवटी प्रकल्पाला हिरवा झेंडा मिळाला. कामाची पूर्वतयारी करून काही सोयीे सुविधा निर्माण कराव्या लागल्या. जसे सप्लायर्स पाहिजे होते तसेच कामगार, इंजिनिअर, कन्सल्टंट वगैरे लागणार होतेच.

इंजिनियर्सना किंवा विदेशी कन्सल्टंटना राहण्यासाठी किहीमला कॉलनी उभी केली गेली; जी माझ्या दुकानापासून जवळ होती. त्यात राहणा-यांच्या अनेक गरजा होत्या, त्यापैकी वृत्तपत्राची एजन्सी माझ्याकडे असल्याने नवीन येणारा प्रत्येक जण माझ्या दुकानात यायचा नि पेपर हे निमित्त असलं तरी इतर अनेक वस्तूंची खरेदी व्हायची. केवळ ग्राहक नि दुकानदार एवढंच न राहता एक नातं निर्माण होत होतं. जे आज चाळीस वर्षानंतरही पुढच्या पिढीपर्यंत टिकून राहिलंय.

अशातच काही विदेशी ( जपान, फ्रान्स, डेन्मार्क वगैरे देशातून) इंजिनियर आले, ते किहीम कॉलनीतच राहत. काही सिंगल तर काही फॅमिलीसह आले होते. माझ्या दुकानातील काही  सामानाव्यतिरिक्त त्यांना हवी असलेली स्पार्सली, सॅलरी, कॉफी बीन्स, बीफ, पोर्क, चिरूट वगैरे गोष्टी दर आठवड्याला मुंबईला जाऊन आणून द्याव्या लागत.

त्याचवेळी एक विदेशी कुटुंब अगदी लहान बाळासह (गोरीपान बाहुलीसारखी मुलगी) दुकानात यायचं. त्या बाळाला कॉऊंटरवर ठेवून बाकी खरेदी करायचं. त्यावेळी चोंढीत विशेष दुकानं नसल्याने माझं एकमेव दुकानच त्यांचं खरेदीचे ठिकाण होतं. यथावकाश प्रकल्पाचे काम संपले नि हळुहळू हे विदेशी पाहुणे परत गेले. अधुनमधून कन्सल्टींगसाठी आले की, आवर्जून दुकानात येऊन भेटून जात होते.

साधारण वीसएक वर्षांचा कालावधी निघून गेला आणि एके दिवशी तीच विदेशी फॅमिली अचानक दुकानात आली असता त्यांच्याबरोबर एक तरुणीही होती... ती तीच मुलगी जी माझ्या कॉऊंटरवर ठेवलेली असायची.  तिच्या बाबाने ‘तो' उल्लेख करत माझी ओळख करुन दिली. मला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त त्या मुलीला झाला. त्यांनी दुकान पाहिलंच पण माझं घर, घरातील मांजरी, पाळलेल्या कोंबड्या, कुत्रे आणि परसदारी चक्कर मारून येताना त्यांच्या चेह-यावर समाधान नि झालेला आनंद अगदी ओसंडून वाहत होता. वीस वर्षानंतरही ‘अरुण स्टोअर्स' दाखवायला आलेल्या त्या फॉरेनरला मी मनोमन साष्टांग नमस्कार घातला.

वाचकहो,  अशा कितीतरी आठवणी असून आता निवृत्त जीवन सुखकर करण्यासाठी मी त्या आपल्याबरोबर शेअर करतोय. आपला अभिप्राय अर्थातच महत्वाचा.
- विलास समेळ 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कजेर