तुर्भे स्टोअर येथील नियोजित उड्डाणपुलासाठी स्वाक्षरी मोहीम

वाशी : नवी मुंबई महापालिका तर्फे तुर्भे स्टोअर येथील नियोजित उड्डाणपूल निर्माण कार्य त्वरित सुरु करण्यात यावे, या मागणीची तड लावण्यासाठी तुर्भे स्टोअर संघर्ष समिती मार्फत भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत २६ नोव्हेंबर रोजी तुर्भे स्टोअर येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत हजारो नागरिकांनी  सहभाग घेतला.

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर येथे रस्ता ओलांडताना मागील दहा वर्षात २३ व्यक्तींचा अपघातात मृत्यु झाला असून, ५० पेक्षा जास्त व्यक्ती अपघातात जखमी झाल्या आहेत. त्यामुळे तुर्भे स्टोअर येथे नवी मुंबई महापालिका तर्फे उड्डाणपुल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, मागील दीड वर्षापासून तुर्भे स्टोअर येथील उड्डाणपुल उभारणीचे काम कासव गतीने सुरु आहे. उड्डाणपुल उभारणीच्या कामास.होत असलेल्या दिरंगाईमुळे तुर्भे स्टोअर येथे रात्री पुन्हा एकदा रस्ते अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. 

१ नोव्हेंबर पासून तुर्भे स्टोअर येथे पाच रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे  तुर्भे स्टोअर येथील उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरु करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मात्र, तुर्भे स्टोअर येथील नागरिकांच्या मागणीकडे नवी मुंबई महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधत तुर्भे स्टोअर येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. याप्रसंगी ‘तुर्भे स्टोअर संघर्ष समिती'चे संतोष श्रीमंत जाधव, संजय कांबळे, नितीन कांबळे, अभिमान जगताप, अमर अंभोरे, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. स्वाक्षरी मोहिमेला तुर्भे स्टोअर येथील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नमुंमपा उप-अभियंता किशोर अमरनानी, विनोद जैन यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी