नमुंमपा उप-अभियंता किशोर अमरनानी, विनोद जैन यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी

नवी मुंबई  : महापालिका आस्थापनेतील उप अभियंता किशोर अमरनानी व कनिष्ठ अभियंता विनोद जैन यांचे अन्यायकारक निलंबन रद्द करण्याची लेखी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

पालिका प्रशासनाने उप अभियंता (स्थापत्य) किशोर अमरनानी व कनिष्ठ अभियंता विनोद जैन यांच्यावर त्यांची कोणत्याही प्रकारची बाजू समजून न घेता त्यांचे अन्यायकारक निलंबन केलेले आहे. पालिका प्रशासनाने १० ऑक्टोबर २०२४ रोजी पामबीच मार्गावरील सायकल ट्रॅकबाबत नोटीस पाठवत त्यांची भूमिका मांडण्यास सांगितले असता, संबंधितांनी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी महापालिका प्रशासनास खुलासाही सादर केला होता. हा खुलासा आपण गांभीर्याने वाचल्यास त्यामध्ये त्यांनी या कामाबाबत विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, स्थापत्य व विद्युत विभागाचे उपअभियंता यांच्यासोबत पालिकेचे सल्लागार हितेन सेठी यांनी कंत्राटदारासमवेत १८ मे २०२४ रोजी प्रत्यक्ष पाहणी दौराही केला होता. या कामांबाबत मुदत संपल्यावर काय करावयाचे याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालनही केले होते, असे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

किशोर अमरनानी व विनोद जैन यांनी उपरोक्तप्रमाणे सायकल ट्रॅकच्या कामासाठीचे देयक हे प्रस्तावित केलेले आहे. प्रस्तावित केलेले देयक मंजूर करणे त्या त्रुटी काढणे, पुर्नपाहणी करणे व त्यात  काही त्रुटी असल्यास त्यांची प्रतिपूर्ती करून घेणे या सर्व बाबी शहर अभियंता तथा महापालिका आयुक्त यांच्या स्तरावरून केल्या जातात. विनोद जैन यांनी प्रस्तावित केलेले देयक तत्कालीन शहर अभियंता तथा तत्कालीन कार्यकारी अभियंता यांच्या निर्देशावरून केलेले आहे.  त्यांचे देयक जर त्रुटी पूर्ण असेल, चुकीचे असेल तसेच काम पूर्ण होण्याआधीच प्रस्तावित केलेले असेल तर वरिष्ठांनी त्या त्रुटी काढून त्या त्रुटींची प्रतिपूर्तीकरण्यासाठी अथवा काम पूर्ण करण्यासाठी अथवा अन्य कारणासाठी ते पुन्हा त्यांच्याकडे पाठवणे अभिप्रेत आहे परंतु या प्रकरणात कनिष्ठ अभियंता तथा उपयोग उपअभियंता यांनी प्रस्तावित केलेले देयक कार्यकारी अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता आणि शहर अभियंता या तिघांनी साक्षांकित करून आयुक्तांकडे सादर केलेले आहे. त्यामुळे या तिघांनीही पर्यवेक्षण चूक केलेली आहे. मात्र, या सर्वांची कुऱ्हाड केवळ कनिष्ठ अभियंता व उप अभियंता यांच्यावर कोसळलेली असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

देयक प्रस्तावित करणे म्हणजे महापालिकेच्या महसुलाचा अपहार नव्हे, हे देयक अदा करण्यात आलेले नाही त्यामुळे महापालिकेचा महसूल कुठेही बुडालेला नाही. तसेच महापालिकेच्या पैशाचा अपहार झालेला नाही. हे कार्यालयीन कागदी चूक आहे व या चुकीमुळे महापालिकेचे नुकसान झालेले नाही. अशा प्रकरणात चौकशी मॅन्युअलमध्ये नमूद असलेल्या तरतुदीनुसार ‌‘कारणे दाखवा, नोटीस बजावणे', ‌‘कारणे दाखवा' नोटीसचे उत्तर असमाधानकारक असल्यास उत्तर फेटाळणे व समज पत्र देणे अथवा प्राथमिक चौकशी करणे या बाबी केल्या जातात. किशोर अमरनानी उपभियंता व विनोद जैन कनिष्ठ अभियंता या दोघांच्या निलंबनाची कार्यकारी अभियंता अतिरिक्त शहर अभियंता व शहर अभियंता या तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली नाही. त्यांचा खुलासा घेतलेला नाही. या कामाचा आयआयटीचा थर्ड पार्टी अहवालही सादर झालेला आहे.  या कामाला  अगोदर फारशी गती नव्हती. उप अभियंता किशोर अमरनानी व कनिष्ठ अभियंता विनोद जैन यांनी याप्रकरणी  लक्ष घातल्यावर कामाला गती मिळाली, ही वस्तूस्थिती आपणास नाकारता येणार नाही. कनिष्ठ अभियंता विनोद जैन व उपअभियंता किशोर अमरनानी या दोघांना कार्यकारी अभियंताचे कारणे दाखवा नोटीसचे पत्र देण्यात आलेले आहे, व खुलासा मान्य अमान्य न करता निलंबित करण्यात आलेले आहे. सदर बाब महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील १९७९च्या तरतुदीस धरून नाही त्यामुळे या दोघांचे निलंबन अन्यायकारक असल्याचे सांगत निलंबनला स्थगिती देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावणे मधील मोकळी जागा, २०० झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणवादी सरसावले