नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
भिवंडीतील अवैध भंगार गोदामे असुरक्षित
भिवंडी : भिवंडीतील बेकायदा भंगार गोदामे आता सुस्थितीत नाहीत. अवैध भंगार गोदामांमुळे नेहमी आगी लागण्याच्या घटना घडतात. त्याचा फटका लोकवस्तीचा देखील बसतो. सदरची वित्तहानी थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने या अवैध भंगार गोदामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
भिवंडी शहर आणि परिसरात अनेक भंगार गोदामे बेकायदेशीरपणे सुरु आहेत. त्यांच्याकडे या व्यवसायासाठी कोणतेही प्रमाणपत्र नाही. अवैध भंगार गोदामामुळे दोनच दिवसापूर्वी शहरातील फातमा नगर परिसरात आगीची मोठी घटना घडली होती. शहर आणि परिसरात वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर अंकुश आणण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भंगार गोदामास लागून असलेल्या लोकवस्ती मधून होऊ लागली आहे.
भिवंडीतील अंजूरफाटा, राहनाळ, पूर्णा, कशेळी, धामणकरनाका, रोशनबाग, कल्याण रोड, नदीनाका, श्रीरंगनगर, आसबीसह शहर आणि ग्रामीण परिसरात प्रत्येक ठिकाणी बेकायदेशीर भंगाराची गोदामे असून तेथे कोणत्याही प्रकारचा माल ठेऊन विकला जातो.
भंगार व्यावसायिक त्यांच्या इच्छेनुसार विविध प्रकारचा माल खरेदी करुन विक्री करतात. अशा गोदामांमध्ये स्फोटक रसायनाचे ड्रम देखील साठवून ठेवतात. त्यामुळे आग लागून अनेकांचा बळी गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच अनेकवेळा भंगार मालाचे व्यापारी चोरीचा माल देखील विकत घेतात.
भिवंडी आणि परिसरात भंगाराच्या गोदामातून लाखो रुपयांच्या व्यवहाराची उलाढाल होत असते. मात्र, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नाही. तसेच त्यांच्या व्यवसाय संबंधी पोलिसांसह कोणत्याही सरकारी कार्यालयात नोंद नाही. मात्र, आगीसह इतर दुर्घटना घडल्यानंतर संबंधित सरकारी कार्यालयाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करतात. त्यानंतर पुन्हा जैसे थे भंगार व्यवसाय सुरु राहतो.
बेकायदा गोदाम मालकांची चौकशी करुन त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. जेणेकरुन शहरात जाळपोळीच्या घटना पुन्हा घडणार नाहीत.
-मोहन दहीकर, पोलीस उपायुवत-भिवंडी.
महापालिका क्षेत्रामधील सर्व बेकायदा भंगार गोदामांचे सर्वेक्षण करुन त्या गोदामांवर लवकरच कारवाई केली जाईल.
-अजय वैद्य, आयुवत-भिवंडी महापालिका. 
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    