‘कॉर्पोरेट पार्क'साठी राखीव भूखंडावर आठवडी बाजार

खारघर : खारघर मधील ‘सिडको'ने कॉर्पोरेट पार्क करिता आरक्षित केलेल्या भूखंडावर आठवडी बाजार भरविला जात आहे. मात्र, या अनधिकृत आठवडी बाजारकडे सिडको अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघर परिसरात सेक्टर निहाय दादा मंडळींच्या सहकार्याने  मैदान, रस्त्यावर आणि  बस थांबा समोर आठवडी बाजार भरविला  जात असूनही पनवेल महापालिका अधिकाऱ्यांकडून डोळेझाक केला जात असल्यामुळे नागरिक नाराजी व्यवत करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ओवे गाव लगत ‘सिडको'ने  कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव ठेवलेल्या  भूखंडावर अतिक्रमण होऊ  नये यासाठी तार कुंपण केले आहे. मात्र, भूखंड भोवतालचे तार कुंपण काढून या भूखंडावर आठवडी बाजार भरविला जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यवत होत आहे.तसेच कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव भूखंडावर काही नागरिकांनी ढाबा, रेती, खडी, भंगार दुकाने तर काही नागरिकांनी वाहने धुण्याची दुकाने थाटली आहेत. ‘सिडको'च्या भूखंडावर अतिक्रमण करुन त्यावर अनधिकृतपणे व्यवसाय करुनही त्याकडे सिडको अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. सदर भूखंड सिडकोचा असल्यामुळे पनवेल महापालिकेचे अधिकारी कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावरील अतिक्रमणाकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव ठेवलेल्या  भूखंडावरील अतिक्रमणावर वरिष्ठ सिडको अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील  अधिकाऱ्यांनी कॉर्पोरेट पार्कसाठी राखीव ठेवलेल्या  भूखंडावरील अतिक्रमणाची स्थळ पाहणी करुन योग्य ती कारवाई करावी अशी सूचना केली जाणार आहे. - सुरेश मेंगडे, दक्षता अधिकारी - सिडको. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये सोनेरी कोल्हे