नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
नमुंमपा मुख्यालयात आयुक्त शिंदे यांच्यासमवेत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन
नवी मुंबई : ‘संविधान दिन'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका मुख्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘संविधान'च्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावर्षी ‘भारतीय संविधान'ला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन २०२४-२५ पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा होत आहे. ‘संविधान'चे आपल्या जीवनात अतिशय महत्व असून ‘संविधान'मुळे आपल्याला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आणि अधिकार मिळालेले आहेत.
त्यामुळे घटनेतील तत्वांचा आपण जीवनात अंगिकार केला तर आपला देश अधिक सक्षम, सुदृढ बनेल आणि प्रभावी लोकशाही राबविणारा देश म्हणून जगभरात अधिक नावलौकिक मिळवेल, असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त किसनराव पलांडे, भागवत डोईफोडे, डॉ. अजय गडदे, अभिलाषा म्हात्रे-पाटील, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्विकृत करुन २६ जानेवारी १९५० पासून ‘संविधान'ची अंमलबजावणी सुरु झाली. ‘संविधान'चे महत्त्व अनेक स्तरांवर असून ‘भारतीय संविधान'मध्ये समाजवादी, र्धमनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा आणि संधीची समानता प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुता या मुल्यांचा विचार केलेला आहे. देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत संविधान महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे संविधान अमृत महोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे.
दरम्यान, ‘संविधान दिन'निमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयासह महापालिकेची आठ विभाग कार्यालये आणि इतर कार्यालये तसेच शाळांमध्येही ‘संविधान'च्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
यावेळी २००८ मधील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, जवान, नागरिक यांनाही भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    