नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
उरण तालुक्यात भात कापणी-मळणी कामे अंतिम टप्प्यात
उरण : उरण तालुक्यातील भात कापणी, बांधणी आणि झोडणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. वाढती मजुरी आणि मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, बांधणी आणि मळणीच्या कामाला लागले आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुण-तरुणींचा देखील सहभाग प्रकर्षाने आहे.
निसर्ग चक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस याची भीती शेतकऱ्यांच्या मनात असते. त्यातच हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची भात कापणी, झोडणी करिता धावपळ सुरु असून, भात कापणी, मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. परंतु, भात कापणी, मळणीची कामे करण्यासाठी वेळीच मजूर मिळत नसल्याने उरण तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाईलाजाने शेतकरी स्वतःच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या मदतीने भात कापणी, झोडणीची कामे करताना दिसत आहेत.
एकेकाळी उरण तालुक्यात भातकापणी झाल्यानंतर भात पिकांची कडवी चार दिवस चांगली वाळल्यानंतरच भाताचे भारे बांधून, ते उडव्यात रचून ठेवले जात असत. त्यानंतर शेतातच खळा तयार करुन, त्याचे व्यवस्थित शेणाने सारवण करुन, त्यानंतर त्या खळ्यावर मळणीची प्रक्रिया केली जात होती. परंतु, सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले कष्ट आणि त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून, शेतकरी पिके न वाळवताच आणि पिकाची साठवणूक न करताच, ताबडतोब कापलेल्या भात पीकाची मळणी करुन, भात घरी आणत आहेत. पूर्वी उरण तालुका भाताचे कोठार समजला जात होता. परंतु, मागील काही वर्षापासून येथे औद्योगीकरण वाढल्याने भात शेती लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. याशिवाय भातशेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागात भात शेतीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टीचा फटका भात शेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरुन भात कापणी, मळणीची कामे करुन घेत आहेत. मात्र, वेळीच मजूर मिळत नसल्याने भातशेतीची कामे लांबवली आहेत. अजूनही उरण तालुक्यात अनेक शेतकरी पारंपरिक पध्दतीने म्हणजे कापणी यंत्राचा वापर न करता विळ्याने भात कापणी करुन, हाताने झोडणीची कामे करताना दिसत आहेत. पूर्वी उरण तालुक्यात कापणी, मळणीची कामे करण्यासाठी शेतकरी भल्या पहाटे जाताना दिसत होता. मात्र आता या भागात तसे चित्र दिसून येत नाही.
दरम्यान, उरण भागातील काही शेतकरी भातशेती टिकवून ठेवण्यासाठी सहकुटुंबाची मदत घेऊन शेतीची कामे करत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस महागाईत वाढ झाल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना मजुरी दर परवडणारे नसल्याने घरातील, कुटुंबातील तसेच अन्य नातेवाईक कुटुंबांच्या मदतीने आळीपाळीने कापणी आणि मळणीची कामे शेतकरी करीत आहेत. यात महिला वर्गांचा मोठा सहभाग असल्याचे चित्र दिसत आहे.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    