भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर वाहनांचे पार्किंग

भिवंडीः भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर बेकायदा पार्किंग केले जात आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या नवीन हायटेक इमारतीच्या कंपाउंडच्या बाहेर फुटपाथलगत शाळेच्या बसेस आणि खासगी वाहने मुख्य गेटसमोर उभी असतात. त्यांना हटवून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महापालिका प्रशासन उदासीन राहिले आहे.शहरातील अतिक्रमणे हटवणाऱ्या मनपाला समोरची अतिक्रमणे काढता येत नसल्याची चर्चा शहरात आहे.

भिवंडी महापालिकेने मुख्य प्रशासकीय सहा मजली नवीन इमारत कोट्यवधी रुपये खर्च करून १९ मे २०१३ रोजी राष्ट्रवादीचे (शरद) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले.तसेच महापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती ठीक नसताना या इमारतीच्या सुरक्षेवर महापालिका दरमहा लाखो रुपये खर्च करते.असे असताना या इमारतीच्या सभोवताली भंगार गाड्या आणि मोठ्या वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे रस्ते लहान होऊन वाहनांना अडथळे निर्माण होत आहेत.

याप्रकरणी मनपाचे अतिक्रमण विभाग देखील दुर्लक्ष करीत असल्याचे म्हटले जात असून यामुळे  पालिकेची सुरक्षा धोक्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी फोरम फॉर जस्टीसचे सचिव कैलास कर्णकार यांनी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांना लेखी पत्र देऊन महानगरपालिका प्रशासकीय इमारती लगत नेहमी उभी असलेल्या जुन्या - नव्या वाहनांना प्रतिबंध करावा तसेच सुरक्षा रक्षकांमार्फत नियमित इमारतीभोवती राउंड मारून हि वाहने हटविण्याची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण तालुक्यात भात कापणी-मळणी कामे अंतिम टप्प्यात