नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
तुर्भे स्टोअर येथे ट्रेलरच्या धडकेत 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
नवी मुंबई : सुरक्षारक्षकाची ड्यूटी संपवून आपल्या घरी निघालेल्या एका व्यक्तीला भरधाव ट्रेलरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास ठाणे बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर्स येथे घडली. या अपघातानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.
या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव रामलाल रामकिसन प्रसाद (60) असे असुन ते तुर्भे स्टोअर्स येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्ये कुटुंबासह राहत होते. तसेच ते सानपाडा सेक्टर-5 मधील एका इमारतीवर सुरक्षारक्षक म्हणुन काम करत होते. शुक्रवारी रात्री 10 वाजता ड्यूटी संपवून रामलाल प्रसाद हे तुर्भे स्टोअर्स येथे आपल्या घरी जात होते. यावेळी ते तुर्भे स्टोअर्स समोरुन ठाणे बेलापूर मार्ग ओलांडून जात असताना, त्यांना भरधाव ट्रेलरने धडक दिली. यात रामलाल प्रसाद गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, तुर्भे स्टोअर्स येथे ठाणे बेलापूर मार्ग ओलांडून जाताना वाहनांची धडक बसल्याने या ठिकाणी अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. मात्र या उड्डाणपुलाचे काम रखडल्याने या ठिकाणी आणखी अपघातात एकाचा बळी गेला आहे. त्यामुळे या अपघाताला जबाबदार धरुन संबधीत कंत्राटदार, तसेच नवी मुंबई पालिका आयुक्त व संबंधित पालिका इंजिनियरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी येथील नागरीकांकडुन करण्यात येत आहे.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    