नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुर्नरचना करण्याचा पोलीस आयुक्तांचा प्रस्ताव
विधानसभा निवडणुकीनंतरच परिमंडळ-3च्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता
नवी मुंबई : नवी मुंबईत होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नव्याने भर पडणारे विविध प्रकल्प, आयटी कंपन्या यामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराची लोकसंख्या झपाटयाने वाढत आहे. त्यामानाने उपलब्ध पोलीस ठाण्यावर प्रचंड ताण पडु लागला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ लागल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने परिमंडळ-३ चा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात १ पोलीस उपआयुक्त, २ सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच ४ नवीन पोलीस स्टेशनची भर पडणार आहे. या प्रस्तावावर विधानसभा निवडणुकीनंतरच निर्णय होण्याची शक्यता असल्याने नवीन परिमंडळासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये दिघा ते बेलापुर हा नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्राचा तसेच पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील पनवेल-खारघर, तळोजा तसेच उरणपर्यतच्या परिसराचा समावेश आहे. सिडकोच्या माध्यमातून १९७० मध्ये नवी मुंबईच्या निर्मितीस सुरुवात झाल्यानंतर नवी मुंबईचा नियोजनबद्घ पद्धतीने झपाटयाने विस्तार झाला. या भागात अनेक नामांकित शिक्षण संस्था व आयटी कंपन्या आल्याने नवी मुंबईची सायबर सिटी आणि एज्युकेशन हब म्हणून ओळख निर्माण झाली. शहरात असलेले उद्योगधंदे, उत्तम निवासाची सोय, मुबलक पाणी, शैक्षणिक संस्थांचे पसरलेले जाळे, दळणवळणाची साधने, त्यामुळे मुंबई-ठाणे-पुणे यांच्या मध्यवर्ती असलेल्या नवी मुंबईच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे.
त्यातच या ठिकाणी प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो रेल, सागरी सेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागरीकरणात सातत्याने मोठया प्रमाणात भर पडत आहे. वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत पोलीस बळ अपुरे पडु लागल्याने पोलीस बळावर प्रचंड ताण वाढु लागला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस दलाला पोलीस बळाची व पोलीस स्टेशनची कमतरता भासु लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी नवी मुंबई आयुक्तालयाची भौगोलीक परिस्थिती, पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणा-या गुह्यांची संख्या, निर्माण होणारे कायदा व सुव्यस्थेचे प्रश्न, परिसरातील लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र इत्यादी बाबींचा विचार करुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये नव्याने परिमंडळ-३ निर्माण करुन त्याअंतर्गत नव्याने २ विभाग तयार करण्याचा तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुर्नरचना करण्याचा प्रस्ताव गृहविभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
परिमंडळ-१ मधील रबाले पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऐरोली व सभोवतालची गावे तसेच घणसोली गाव आणि घणसोली कॉलनी परिसराचा समावेश आहे. घणसोली गाव आणि घणसोली कॉलनी परिसराची लोकसंख्या लाखाहून अधिक आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असतो. ऐरोली ते घणसोली या परिसरातील कायदा व सुव्यस्था राखण्यास स्थानिक पोलीस स्टेशनला मर्यादा पडत आहेत. त्यामुळे रबाळे पोलीस ठाण्याचे विभाजन करुन पुर्नरचित घणसोली पोलीस स्टेशन तसेच ऐरोली विभागासाठी स्वतंत्र ऐरोली पोलीस स्टेशनचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाने तयार केलेला आहे.
त्याचप्रमाणे परिमंडळ-२ मधील पनवेल शहर पोलीस स्टेशनअंतर्गत येणा-या करंजाडे या नोडची लोकसंख्या झपाटयाने वाढत असल्याने या भागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रस्ताव पोलीस आयुक्तालयाने तयार केला आहे. त्याशिवाय प्रस्तावित असलेल्या परिमंडळ-३ मधील उरण आणि मोरा पोलीस ठाण्यांचे एकत्रिकरण करुन पुर्नरचित उरण-मोरा पोलीस स्टेशनचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरु असून लवकरच ते पूर्णत्वास येईल. विमानतळाच्या सभोवताली नागरीकरण विकसित झालेले आहे. विमानतळ आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसराची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज असल्याने पोलीस आयुक्तालयाने विमानतळ पोलीस स्टेशन देखील प्रस्तावित केले आहे.
त्याचप्रमाणे उरण मधील सिडकोने विकसित केलेल्या द्रोणागिरी नोडचा झपाट्याने विकास होत असल्याने या नोडसाठी स्वतंत्र द्रोणागिरी पोलीस स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनची संख्या २४ वर जाणार आहे. या प्रस्तावाला शासनाकडुन लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडुन प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, उलवे नोडमध्ये झपाटयाने नागरीकरण होत असल्याने येथील कायदा व सुवव्यस्थेचा विचार करुन शासनाने उलवा विभागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी नुकतेच उलवा पोलीस स्टेशनचे उद्घाटन देखील केले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची अशा पद्धतीने होणार पुर्नरचना
परिमंडळ-१ मधील पोलीस स्टेशनची संख्या आता ७ होणार असून यात रबाळे विभाग सहाय्यक पोलीस आयुक्तांची वाढ होणार आहे. त्यांच्या अधिपत्याखाली रबाळे एमआयडीसी, पुर्नरचित घणसोली, प्रस्तावित ऐरोली आणि तुर्भे या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वाशी यांच्या अधिपत्याखाली वाशी, एपीएमसी आणि कोपरखैरणे या ३ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे.
परिमंडळ-२ मधील पोलीस स्टेशनची संख्या ८ होणार असून यात खारघर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची भर पडणार आहे. त्यांच्या अधिपत्याखाली खारघर, कळंबोली, कामोठे आणि तळोजा या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. तर पनवेल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या अधिपत्याखाली पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर आणि प्रस्तावित करंजाडे या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे.
नव्याने स्थापन होणाऱ्या परिमंडळ-३ मधील पोलीस स्टेशनची संख्या ९ होणार असून यात सीबीडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची भर पडणार आहे. त्यांच्या अधिपत्याखाली सीबीडी, एनआरआय सागरी, नेरुळ, सानपाडा या ४ पोलीस स्टेशनचा समावेश असणार आहे. तसेच पोर्ट विभाग सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली नुकतेच उद्घाटन झालेले उलवा, न्हावा-शेवा, पुर्नरचित उरण-मोरा, प्रस्तावित द्रोणागिरी, प्रस्तावित विमानतळ या ५ पोलीस स्टेशनचा समावेश असणार. - संजयकुमार पाटील (पोलीस उपायुक्त मुख्यालय)
नवी मुंबई आयुक्तालयाची भौगोलीक परिस्थिती, पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणा-या गुह्यांची संख्या, निर्माण होणारे कायदा व सुव्यस्थेचे प्रश्न, परिसरातील लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र इत्यादी बाबींचा तसेच पुढील २० वर्षाचा विचार करून परिमंडळ-३ चा व नव्याने ४ पोलीस स्टेशन सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव गृहविभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शासनाकडून या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची आशा आहे.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    