नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
परराज्यातील घाऊक व्यावसायिकांमुळे ‘पणती' व्यवसाय आर्थिक गर्तेत
भिवंडी : परराज्यातून मातीच्या पणत्यासह इतर मातीच्या वस्तू भिवंडीत आणून स्वस्त किंमतीमध्ये विकल्याने शहरातील कुंभारवाड्यात सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने कुंभार व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांची दिवाळी अडचणीत आली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने पणती आणि लहान मुलांसाठी मातीची खेळणी तसेच इतर देवदेवतांच्या मातीच्या मूर्तींचे उत्पादन कल्याण येथील काळातलाव येथे होत होते. भिवंडीतील कुंभार समाजातील व्यावसायिक तेथून सुमारे ५ ते १० लॉरी भरलेला माल विक्रीसाठी शहरातील कुंभारवाड्यात आणत होते. मात्र, शहराचा विस्तार झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी लोकवस्ती वाढली. तेथील नागरिकांना शहरातील कुंभारवाड्यात येणे न परवडल्याने त्यांनी जवळच असलेल्या किराणा किंवा जनरल स्टोअर मध्ये मिळणाऱ्या पणत्या खरेदी करणे सुरु केले. परिणामी, सदर दुकानदार शहरातील घाऊक पणत्यांचा व्यापार करणाऱ्या कुंभारवाड्यातील कुंभारांकडून माल घेऊ लागले. सदर व्यवहार परराज्यातील घाऊक व्यावसायिकांना समजल्यानंतर त्यांनी स्वतः भिवंडीतील विविध भागातील किराणा दुकानदार आणि जनरल स्टोअरच्या दुकानदारांना यावर्षी प्रथमच पणत्या आणि मातीच्या वस्तू विक्रीसाठी दिल्याने कुंभारवाड्यातील व्यावसायिकांची आणि स्थानिक ग्राहकांची गर्दी कमी झाली. त्यामुळे कुंभारवाड्यातील कुंभार समाजातील व्यावसायिक आर्थिक गर्तेत आले आहेत.
भिवंडी यंत्रमागाची नगरी असल्याने दिवाळी सणाच्या दिवशी पणत्यांच्या प्रकाशाने सदर कारखाने उजळून निघत होते. तर शहरातील लोकवस्तीत असलेले वाडे आणि बाजारपेठेतील दुकानांसह शहरातील विविध दुकानात मातीच्या पणत्या लावल्या जात होत्या. परंतु, सध्या पूर्वीचे सुगीचे दिवस न राहिल्याने कारखाना मालकांनी आणि अनेक श्रीमंत लोकांनी मातीच्या पणत्या लावणे कमी केले असून काही काळासाठी जळणारी मेणाची फॅन्सी पणत्या लावणे सुरु केले आहे. त्यासाठी विविध डिझाईनमध्ये फॅन्सी पणत्या मार्केटमध्ये आल्या असून भेट देण्यासाठी काही फॅन्सी पणत्यांची आकर्षक पॅकिंग देखील केली गेली आहे. या पणत्या हळूहळू मातीच्या पणत्यांवर शिरजोर होऊ लागल्या आहेत. मॉल आणि चांगल्या दुकानात या फॅन्सी पणत्या विक्रीसाठी आल्या असल्याने या आकर्षक पणत्या ग्राहकांचे लक्ष्य वेधून घेत आहेत. काही वर्षानंतर सदर फॅन्सी पणत्यांचे मार्केट जोर धरेल, अशी चर्चा मार्केटमध्ये सुरु झाली आहे.
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    