नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
खारघर मध्ये ‘सिडको'ची ३८४३ घरे
खारघर : ‘सिडको'ने दसऱ्याच्या मुहूर्तावर २६ हजार सदनिकांच्या महागृहनिर्माण योजना साठी जाहीर केलेल्या सोडत प्रक्रियेत खारघर परिसरातील ३,८४३ घरे उपलब्ध केली आहेत. सदर गृहप्रकल्प खारघर रेल्वे स्थानक आणि नवी मुंबई मेट्रो स्थानक शेजारी असल्यामुळे घरांना पसंती देत तेथील सॅम्पल पलॅट पाहण्यासाठी नागरिकांकडून गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत ‘सिडको'ने ‘सर्वांसाठी घर' या योजना अंर्तगत नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीत ४० हजार घरांचे काम अंतिम टप्यात आहे. दरम्यान, दसऱ्याच्या मुहूर्तावर महागृहनिर्माण योजना अंतर्गत ‘सिडको'ने २६ हजार सदनिकांची गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. त्यामध्ये खारघर रेल्वे स्थानकाशेजारी १८०३, खारघर सेक्टर-१४ डी-मार्ट समोर १७०० तर खारघर गांव मेट्रो स्थानक शेजारी ३४० अशी एकूण ३,८४३ घरे सोडतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे खारघर रेल्वे स्थानक पासून ५० मीटर अंतरावर गृहनिर्माण प्रकल्पात १५ मजल्याच्या एकूण १७ इमारती असून ५४० चौरस फुट चटई क्षेत्रफळ असलेली सर्व घरे टुबीएचके प्रकाराची आहेत. विशेष म्हणजे सदर गृहप्रकल्पालगत खाडीकिनारा आहे. त्यामुळे थंड वातावरण तसेच इमारतीच्या छत आणि गच्चीवरुन समुद्रात येणाऱ्या भरती-ओहोटीचा आनंद घेता येणार आहे. तर खाडीच्या दुसऱ्या भागाला नवी मुंबई विमानतळ आहे.
तसेच या गृहप्रकल्पाला लागून खारघर-बेलापूर कोस्टल रोड उभारला जाणार आहे. या गृह प्रकल्पावरुन कोस्टल रोड मार्गे बेलापूर मार्गे मुंबई तसेच नवी मुंबई विमानतळ गाठण्यासाठी सोयीचे होणार आहेत. तसेच सेक्टर-१४ बस डेपो येथे या ठिकाणी १७०० घरे असून सदर घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध आहे. सेक्टर-१४ बस टर्मिनस लगत अल्प उत्पन्न गटासाठी ३४० घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील सदनिकांचे क्षेत्रफळ ३२२ चौरस फुट चटई असणार आहे. खारघर, सेक्टर-१४ मधील गृहप्रकल्प नवी मुंबई मेट्रो मार्गातील खारघर गांव मेट्रो स्थानकालगत आहे. तसेच आजुबाजुला मार्केट परिरस आहे.
एंकदरीतच खारघर मधील तीनही गृहप्रकल्प रेल्वे आणि मेट्रो स्थानक पासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे नागरिकांची खारघर मधील घराला अधिक पसंती देत घरे घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची सॅम्पल पलॅट पाहण्यासाठी गर्दी वाढत आहे.
खारघर रेल्वे स्थानक लगत असलेली टुबीएचके प्रकाराची घरे प्रवासाच्या दृष्टीने खूप चांगली आहेत. त्यामुळे सदर प्रकल्पामध्ये घर नोंदणी करण्याचा मनोदय आहे.  
-नंदा गोपीनाथन, इच्छुक ग्राहक.
खारघर मध्ये ३ ठिकाणी गृहप्रकल्प आहे. सदर ठिकाणी भेट दिल्यास सॅम्पल पलॅट खारघर सेक्टर-१६ विबग्योर शाळेच्या बाजुला उभारण्यात आल्याची माहिती मिळाली असल्याने सदर ठिकाणी शोधण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. तसेच खारघर रेल्वे स्थानक येथील गृहप्रकल्प पाहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना अंधार असलेल्या भुयारी मार्गातून प्रवास करावा लागत आहे. ‘सिडको'ने भुयारी मार्गात विद्युत दिव्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 
 
                     
                                     
                             
                             
                                         
                                         
                                    