दिवाळीसाठी सप्तरंगी रांगोळी बाजारात उपलब्ध

वाशी : दिवाळी म्हटल्यावर सगळीकडे रोषणाई आणि रंगीबेरंगी रंग आलेच. दिवाळी आली की, बाजारात आकर्षित करणारी रांगोळी दिसू लागते. रांगोळी म्हटल्यावर डोळ्यांसमोर आपोआपच एक रंगीत आकृती समोर येते. औरस-चौरस तर कधी टिपक्यांची रांगोळी दारासमोर अतिशय आकर्षक दिसते. त्यामुळे अशा सप्तरंगाच्या रांगोळ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

दिवाळी सणाला प्रत्येकाच्या दारात रांगोळी काढली जाते. आधी सडा शिंपण करुन रांगोळी काढली जायची. मात्र, काळानुरुप आधुनिकीकरण वाढल्याने सिमेंटीकरण झाले. त्यामुळे अशा रांगोळी काढण्याची पध्दत देखील बदलत गेली. महाराष्ट्रात ठिपके काढून जोडण्याची प्रथा होती. पण, आता रांगोळी काढण्यासाठी रेडिमेड सामान उपलब्ध झाले आहे. रांगोळी काढण्यासाठी आवश्यक असणारे छाप, रांगोळी पेन, पाऊलखुणा आणि कागदी छाप बाजारात उपलब्ध झाले आहे. ३० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत असे छाप मिळत आहे. या छाप्याने रांगोळी काढण्यासाठी लागणारी मेहनत कमी केली आहे.

बाजारपेठेमध्ये आता रंगीत रांगोळी उपलब्ध झाल्याने रांगोळीचे रंग तयार करण्याचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे महिला वर्गांचा रंगीबेरंगी रांगोळी खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. पांढरी रांगोळी बाजारात वर्षभर उपलब्ध असते. यामध्ये आपल्या आवडीनुसार वेगवेगळे रंग मिसळून रंगीत रांगोळी तयार केली जाते आणि रांगोळीच्या डिझाईनमध्ये रंग भरले जातात; परंतु आता बाजारपेठेत तयार रंगीत रांगोळी आली आहे. निळा, हिरवा, लाल, भगवा, गुलाबी अशा रांगोळीच्या असंख्य छटा  ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याबरोबरच विविध प्रकारचे तयार छाप बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. छोट्या-छोट्या चौकोनी आणि गोलाकार छापांपासून अगदी २ फुटापर्यंतचे छाप विक्रीसाठी आले आहेत. रांगोळी वेगवेगळ्या प्रतिकांमध्ये काढली जाते. पारंपरिक ठिपक्यांच्या रांगोळीबरोबरच संस्कार भारती, सुलेखन रांगोळी, पानाफुलांच्या रांगोळीचे प्रकार सध्या प्रचलित झाले आहेत. यासाठी तयार रंगीत रांगोळीला अधिक पसंती मिळत आहे.

रांगोळीच्या पुस्तकांना मागणी...
सध्या बाजारात रांगोळीच्या पुस्तकांना देखील मागणी वाढली आहे. याशिवाय कागदी ठिपल्याची कागद देखील बाजारात विक्रीसाठी आली आहेत. रांगोळी या पुस्तकांमध्ये ५ ठिपक्यांपासून ते ३० ते ४० ठिपक्यांच्या डिझाईन पहायला मिळतात. याशिवाय संस्कार भारतीच्या रांगोळीच्या आकर्षक डिझाईन्स देखील सोप्या पध्दतीने असल्याने त्या अनेकांना सहज काढता येतात

स्टिकर रांगोळी...
स्टिकरची रांगोळी, रेडिमेट प्रिंटेड रांगोळी असून हव्या त्या जागी फक्त चिकटवायची असते. या स्टिकरमुळे वेळ वाचतो. तसेच रांगोळी मोडण्याची, खराब होण्याची शक्यता नसते. सध्या बाजारात लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स, तोरण रांगोळीचे स्टिकर्स तर अगदी छोटे रांगोळीचे स्टिकर्स १० रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर मोठ्या रांगोळीचे स्टिकर्स ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यातही आता स्टोन लावलेले, थ्री डी मधील रांगोळीला पसंती मिळत आहे.

बाजारात रांगोळीचे दर (रुपये प्रतिकिलो):
पांढरी ३० ते ३५
विविधरंगी ५०
रांगोळी छापे १० ते ३००
लक्ष्मी पावले १० ते ५०
गो पद्म १० ते ५०
स्वस्तिक १० ते ५०
रांगोळी पेन २५ ते ७० 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर मध्ये ‘सिडको'ची ३८४३ घरे