नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
‘विद्यार्थी सुरक्षा-व्यवस्थापनाची भूमिका' विषयावर कार्यशाळा संपन्न
पनवेल : पनवेल महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार ‘विद्यार्थी सुरक्षा-व्यवस्थापनाची भूमिका' या विषयावरील कार्यशाळा २९ ऑगस्ट रोजी पनवेल मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सी. वाय. पाटील, वाय. एम. भोपी, महापालिका उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, महापालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल-ज्युनिअर कॉलेज कामोठेच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, अधीक्षक किर्ती महाजन तसेच महापालिकेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
जीवनामध्ये पालकांना अपत्य महत्वाचे असते. त्यांची सुरक्षिता अत्यंत महत्वाची असते. शाळा व्यवस्थापनांनी यासाठीच्या सर्व उपाययोजना करणे गांभिर्याने घेतले पाहिजे, असे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सांगितले.
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सी. वाय. पाटील यांनी पोक्सो अधिनियमांतर्गत दाखल होणारे गुन्हे आणि त्यामधील तरतुदी सांगितल्या. तसेच अतिरीक्त सरकारी अभियोक्ता वाय. एम. भोपी यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नितीमत्तेचे धडे शिकविले पाहिजे, पर्यायाने देश घडविताना मुल्याधिष्ठित शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजे, असे सांगितले.
सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत मार्गदर्शन करताना म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जीवन घडविताना तो चांगला नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पोस्को अधिनियम अंतर्गत दाखल होणारे गुन्हे आणि त्याबाबतच्या तपासासाठी पोलीस विभाग अवलंब करत असलेली कार्यपध्दती, सायबर गुन्हे याविषयी माहिती दिली. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिसांनी व्हॉटस्ॲ चॅनेल सुरु केले असल्याचे ते म्हणाले.
प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांनी शाळांनी विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेऊन त्याअनुषंगाने शाळांनी कागदपत्रांचे दस्ताऐवज केले पाहिजे असल्याचे सांगितले. तसेच या विषयाच्या अनुषंगाने शासनाच्या विविध शासन निर्णयानुसार शाळांनी विविध उपाययोजना राबविण्याविषयीची माहिती दिली. विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच, नो टच याविषयी माहिती दिली.
शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी २१ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार सीसीटीव्ही बसविणे आणि आठवड्यातून एकदा त्यामधील फुटेज तपासणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच तक्रारपेटी, सखी सावित्री समिती, परिवहन समिती, शाळा समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापनांनी निर्माण करावयाच्या असून या समिती केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात त्याचे काम सुरु करण्याबाबत चव्हाण यांनी सूचना दिल्या.
सदर कार्यशाळेस महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी शाळांचे, संस्थाचे अध्यक्ष, सचिव, सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व खाजगी अनुदानीत, अशंतः अनुदानीत, विना अनुदानीत, स्वयं अर्थ सहाय्यित शाळांचे मुख्यध्यापक, प्राचार्य, सर्व माध्यमे, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डाच्या शाळांचे २६८ हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.