आगरी समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार

पनवेल : आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय परिस्थितीचा विचार करुन सामुहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी ‘अखिल आगरी समाज परिषद'तर्फे आगरी समाज काल आज आणि उद्या या शीर्षकाखाली समाजातील लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि समाज बांधव, भगिनींचा मेळावा जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांनी समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

सदर मेळाव्यास ‘आगरी समाज परिषद'चे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, खासदार बाळ्यामामा म्हात्रे, खासदार संजय पाटील, आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार मनोहर भोईर, कामगार नेते महेंद्र घरत, उद्योगपती जे. एम. म्हात्रे, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, सरचिटणीस दिपक म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल भगत, लोकनेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, कामगार नेते भूषण पाटील, राजेश गायकर, संतोष केणे, दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुरेश ठाकूर, सोन्या पाटील, संतोष घरत, दीपक पाटील, भावना घाणेकर, वंदना घरत यांच्यासह आगरी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी आगरी समाजातील नवनिवाचित खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि खासदार संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

प्रत्येक समाज आपापल्या संघटना बळकट करत आहेत. आम्हीही आमची आगरी समाजाची संघटना एकसंघ मातृसंस्था म्हणून ‘अखिल आगरी समाज'च्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील नवतरुणांमध्ये जागृती व्हावी याकरिता सदर मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे ‘परिषद'चे अध्यक्ष दशरथ पाटील सांगितले.

प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते ‘दिबां'चे नाव विमानतळाला देण्यात यावे यासाठी जो संघर्ष इथल्या भूमीपुत्रांनी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केला, त्यामुळेच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसत असल्याचे रामशेठ ठाकूर म्हणाले.

आधीपासूनच समाज कष्टाने स्वाभिमानाने जगत राहिला. परंतु, समाजाच्या कथा व्यथा या सर्व मांडण्याकरिता ‘अखिल आगरी समाज परिषद'चे व्यासपीठ निर्माण झाले, ती अभिमानाची गोष्ट असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

मेळाव्यात आ. प्रशांत ठाकूर आणि अन्य वक्त्यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी आगरी दर्पण या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संदीप नाईक प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान