सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून महापालिका मुख्यालय जवळ सीबीडी-बेलापूर, सेवटर-१५ए येथील भूखंड क्र.४ येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या कामातील पहिल्या टप्प्यात २५०कोटी रुपयांच्या ई-निविदा प्रक्रियेस सुरुवात (इंजिनिअरींग, प्रोकरमेंट ॲन्ड कन्स्ट्रक्शन मोड) झाली. याबाबतची संपर्ूण माहिती https://mahatender.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे ‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले.

दुसरीकडे नवी मुंबई मधील फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून झालेला विरोध बघता सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीच्या अनुषंगाने करावयाच्या कामाबाबत नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे आ. मंदाताई म्हात्रे यांनी स्वागत केले आहे. तसेच लवकरात लवकर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन महापालिकेने संबंधित विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यवत केली.

दरम्यान, गेल्या काही वर्षांच्या पाठपुराव्याला, संघर्षाला अखेर यश आल्याची प्रतिक्रियाही आ. मंदाताई म्हात्रे यांनी यानिमित्ताने दिली आहे.

सर्व नवी मुंबईतील नागरिकांना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज प्रकल्प नवी मुंबईकरांसाठी क्रांतीकारक ठरेल. तसेच नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. शिवाय स्थानिक मुला-मुलींना रोजगार निर्माण होणार आहे, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षापासून सदर कामासाठी जो लढा सुरु होता, त्या लढ्याला खऱ्या अर्थाने एक मुर्तस्वरुप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक तसेच नवी मुंबई महापालिका आणि सिडको मधील संबंधित अधिकाऱ्यांनी दिला, त्याबद्दलही आमदार म्हात्रे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

सदर पत्रकार परिषद प्रसंगी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत ज्येष्ठ कार्यकर्ता गोपाळराव गायकवाड, विक्रम पराजुली, विकास सोरटे, मुकुंद विश्वासराव, जयश्री चित्रे, प्रमिला खडसे, सुवर्णा चिकणे तसेच इतर पदाधिकारी-कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘विद्यार्थी सुरक्षा-व्यवस्थापनाची भूमिका' विषयावर कार्यशाळा संपन्न