ठाणेमध्ये गणेशमुर्ती विसर्जनासाठी फिरती व्यवस्था

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी ६ फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून सदर व्यवस्था तयार झाली असून त्यात विसर्जनाची व्यवस्था असलेला ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. या ट्रकवरील टाकीत गणेशमुर्तींचे विसर्जन करता येणार आहे.

महापालिका बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. त्यात ९ विसर्जन घाट, १५ कृत्रिम तलाव, १० मूर्ती स्वीकृती केंद्र आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि ६ फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे.

फिरत्या विसर्जन व्यवस्थेमुळे नागरिकांना विसर्जनाची आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. ठाण्यातील गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक असावा यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत. त्याला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसाच तो या फिरत्या व्यवस्थेलाही मिळेल, असा विश्वास आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.

यावर्षी ८ स्पटेंबर (दीड दिवस), १२ सप्टेंबर (सहा दिवस), १३ सप्टेंबर (७ दिवस) आणि १७ सप्टेंबर (११ वा दिवस) अशा ४ दिवशी सदर फिरती विसर्जन व्यवस्था नोपाडा-कोपरी, माजिवडा-मानपाडा, वागळे आणि वतर्कनगर या ४ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपलब्ध असेल. सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रभाग समिती मधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी फिरत्या वाहनावरील टाकीमध्ये गणेशमुर्तींचे विसर्जन करता येईल. या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी दिली.

महापालिकेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यवस्थेत क्षेत्रातील एकूण २१४ मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी १८४ मंडपांच्या परवानगी देण्यात आल्या आहेत. उर्वरित मंडप परवानगीची प्रक्रिया सुरु असून त्या लवकरच दिल्या जातील, अशी माहिती आयुक्त राव यांनी दिली.

दुसरीकडे पावसाने आता चांगली उसंत घेतली आहे. त्यामुळे रस्ते दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. उड्डाणपुलांवर, आनंदनगर, ओवळा अशा काही भागात रस्ते खराब झाले आहेत. त्यावरील खड्डे तातडीने भरले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जलद वाळणाऱ्या पध्दतीचा वापर खड्डे बुजवण्यासाठी करण्यात आला. त्याचा चांगला परिणाम दिसला असल्याचेही आयुक्त राव म्हणाले.

गेल्यावर्षीपासून महापालिकेने कृत्रिम तलावांच्या सोबतीने छोट्या टाक्यांचीही व्यवस्था विसर्जनासाठी केली होती. त्यानुसार गेल्यावर्षी ४२ ठिकाणी टाक्यांची सुविधा उपलब्ध होती, ती संख्या यंदा ४९ एवढी करण्यात आली आहे. तसेच जेल तलाव, मढवी हाऊस-राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभी नाका, रिजन्सी हाईट्‌स-आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, देवदया नगर-शिवाई नगर या १० ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.

आंबेघोसाळे, मासुंदा दत्त घाट, खारीगाव, घोलाईनगर, दातिवली तलाव, खिडकाळी तलाव, न्यू शिवाजी नगर कळवा तलाव, निळकंठ वूड्‌स- टिकूजीनी वाडी, रेवाळे, बोरिवडे, ब्रम्हांड ऋतू पार्क, हिरानंदानी रायलादेवी-१, रायलादेवी-२, उपवन तलाव परिसर-वर्तकनगर, देवदयानगर अशा १५ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोपरी, पारसिक रेती बंदर, रेतीबंदर-१, रेतीबंदर-२-राणानगर, फास्ट ट्रॅक ब्रिज, बाबाजी पाटील वाडी, शंकर मंदिर घाट, कोलशेत, बाळकूम अशा ९ ठिकाणी विसर्जन घाटांची व्यवस्था आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीच्या कामाला लवकरच सुरुवात