नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
श्री मुर्तींवर अखेरचा हात!
वाशी : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघा एक आठवड्याचा काळ राहिला असून नवी मुंबईतील गणपती कारखान्यांमध्ये आकार घेतलेल्या गणरायाच्या मूर्तींवर कारागीर अखेरचा हात फिरवताना दिसून येत आहेत. यात मूर्तीचे डोळे, दागिने, आदि रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरु असून रंगकाम करणाऱ्या कामगारांना अतिरिक्त मेहनत करावी लागत आहे.
विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघा एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारपेठा सजल्या असून बाजारात तयार श्री मूर्ती विक्रीचे अनेक कला केंद्र सुरु करण्यात आली आहेत. बाजारात तयार मूर्ती जरी उपलब्ध असल्या तरी येथील पारंपरिक आणि स्थानिक गणेशभक्त आजही आपल्या जुन्याच मुर्तिकाराच्या हाताने मूर्ती घडवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे आज जरी नवी मुंबईत हाताच्या बोटावर मोजण्या इतके गणपती कारखाने शिल्लक असले तरी आपल्या जुन्या ग्राहकांसाठी मुर्तीकार आपली कला जिवंत ठेवत कारखाने चालवत आहेत.
नवी मुंबईमध्ये दारावे, तुर्भे, बोनकोडे, घणसोली, कोपरखैरणे, ऐरोली, आदि ठिकाणी आजही असे कारखाने अपुरी जागा असताना आपल्या व्यवसायात तग धरुन आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी तसेच घरघुती गणपतीची बुकींग केलेल्या मूर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्याच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगार राबत आहेत. तर गणेशोत्सव सण आठवड्यावर येऊन ठेपला असल्याने कारखान्यात दिवसरात्र काम सुरु आहे. गणपतीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवणे, मूर्तीवर मोहक रंग चढविणे, डोळ्यांची आखणी, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे, आदि कामे कामगार करीत आहेत, अशी माहिती ‘नवी मुंबई मुर्तीकार संघटना'चे अध्यक्ष संतोष चौलकर यांनी दिली.