नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
उल्हासनगर मनपा मुख्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांची निदर्शने
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची थकबाकी असताना तुटपंजी रक्कम देऊन या कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात ‘कायद्याने वागा' या सामाजिक संघटनाच्या वतीने २९ ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयासमोर निवृत्त कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
उल्हासनगर महापालिकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाने त्यांची देणी, थकबाकीची रक्कम एकहाती मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अगदी क्षुल्लक रक्कम त्यांच्या हाती दिली जाते. आपलेच पैसे घेण्यासाठी वारंवार मुख्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यातही या विभागातून त्या विभागाकडे चौकशीसाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्यात येते. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण होत असल्याच्या तक्रारी निवृत्त कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
उल्हासनगर महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटना ‘कायद्याने वागा' गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील असून या संदर्भात त्यांनी महापालिका प्रशासनाला लेखी निवेदने दिली आहेत. मात्र, या निवेदनानंतरही महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस पावले उचलले नाहीत. त्यानंतर ‘कायद्याने वागा'चे अध्यक्ष राज असराेंडकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, प्रशासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांनी सदर निदर्शने केले.
निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ८ ते १० लाख रुपये थकबाकी, देणी महापालिकाकडे शिल्लक आहे. असे असताना त्यांना दरमहा त्यांना त्यातील २ हजार रुपये दिले जातात. याच गतीने जर त्यांना थकबाकी मिळाली तर पूर्ण रक्कम मिळविण्यासाठी त्यांना २० ते २५ वर्षे लागतील. सर्वोच्च न्यायालयाने देखील निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकबाकी, देणीची रक्कम एक हाती द्यावी. जर या संदर्भात उशीर झाला तर व्याजासहित सदर रक्कम मिळावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. महापालिकेतील ठेकेदारांची लाखो रुपयांची रक्कम तात्काळ दिली जाते; मात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना ती का मिळत नाही? अशी प्रतिक्रिया राज असराेंडकर यांनी दिली आहे.
प्रशासनाकडे उत्पन्नाचे स्तोत्र कमी...
या निदर्शनानंतर निवृत्त कर्मचारी, ‘कायद्याने वागा' संघटनाचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर प्रशासनाकडे उत्पन्नाचे स्तोत्र कमी असून सध्या महापालिका आर्थिक संकटात असल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यास उशीर लागत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.