क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षण संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

ठाणे : महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत शालेय जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा वयोगट १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटाखालील ‘राष्ट्रीय क्रीडा दिन'चे औचित्य साधून प्रथम तीन क्रमांकाच्या शैक्षणिक संस्थांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे गौरविण्यात आले.

याप्रसंगी ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, तालुका क्रीडा अधिकारी सायली जाधव, रुही शिंगाडे, विविध शिक्षण संस्थाचे प्रमुख, क्रीडा प्रशिक्षक, जिल्हा क्रीडा कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

जगप्रसिध्द हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांनी हॉकीमध्ये जागतिक स्तरावर भारताचे प्रतिननिधीत्व करुन केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ‘राष्ट्रीय क्रीडा दिन'चे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षण संस्थांना यामध्ये प्रोत्साहनात्मक अनुदान २०२३-२४ वयोगट १४ वर्षे मध्ये प्रथम क्रमांक फादर ॲग्नेल मल्टीपर्पज स्कुल- ज्युनियर कॉलेज (वाशी), द्वितीय क्रमांक श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळा (ठाणे), तृतीय क्रमांक स्वामी देवप्रकाश शाळा (उल्हासनगर) या संस्थांना जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रोत्साहनात्मक अनुदान वयोगट १७ वर्षे अंतर्गत प्रथम क्रमांक फादर ॲग्नेल मल्टीपर्पज स्कुल, द्वितीय क्रमांक एस.ई.एस. इंग्रजी माध्यम हायस्कुल (उल्हासनगर), तृतीय क्रमांक स्कॉलर्स इंग्लिश हायस्कुल आणि जे. आर. कॉलेज (भिवंडी) यांना शिनगारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तर प्रोत्साहनात्मक अनुदान वयोगट १९ वर्षे मध्ये प्रथम क्रमांक श्रीमती सी.एच.एम कॉलेज (उल्हासनगर), द्वितीय क्रमांक  एस.एस.टी. कॉलेज (उल्हासनगर), तृतीय क्रमांक वेदांत कॉलेज (उल्हासनगर) यांना देखील गौरविण्यात आले.

खेळाडूंच्या अंगी असलेले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी क्रीडा स्पर्धांचा फार चांगला उपयोग होतो. खेळामध्ये आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ज्या शालेय संस्थांना यश आले आहे, त्यांचे अभिनंदन. ज्यांना यश मिळाले नाही, त्यांनी खेळाविषयी अभिमान बाळगून सतत खेळत रहावे. तसेच खेळामध्ये आपण आपल्या जिल्ह्याचे नाव मोठे करु या, असे आवाहन  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले. तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी सुचिता ढमाले यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 उल्हासनगर मध्ये स्वस्त घरे योजना कागदावरच