समता, मानवतेच्या वारीची गरज - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : महाराष्ट्र संतांची भूमी असून संतांनी आपल्याला समता आणि मानवता शिकवली आहे. आजच्या पिढीला समृध्द घडवण्यासाठी मानवते बरोबर समतेची देखील गरज असून त्यातूनच महाराष्ट्र समृध्द राहिल, असे प्रतिपादन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ‘वारी समतेची वारी मानवतेची' या कार्यक्रमात केले.

वारकऱ्यांना परवडणारी घरे मिळावीत तसेच वारकरी पेन्शन योजनेकरिता असणाऱ्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचे साकडे ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघ आयोजित वारी समतेची आणि वारी मानवतेच्या माध्यमातून समतेच्या वारीत सहभागी झालेल्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. जिल्हाधिकारी शिनगारे या वारीत सहभागी झाल्यानंतर दिलेल्या निवेदनात वारकऱ्यांनाही परवडणारी घरे मिळावीत आणि वारकऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शन योजनेची उत्पन्न मर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, काही कारणास्तव नागरिकांना आषाढी वारीत सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांना वारी अनुभवता यावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीवर ठाणे ओबीसी एकीकरण समिती आणि मराठा सेवा संघाने २५ ऑगस्ट रोजी वारी सोहळा आयोजित करण्यात आला. या वारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, फुले दांपत्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन झाली. त्यानंतर कोर्टनाका सर्कल येथे भर पावसात वारकऱ्यांचे गोल रिंगण तसेच अश्व रिंगण पार पडले. या रिंगण सोहळ्यामध्ये जगद्‌गुरु संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्ती आणि भक्ती संगम होऊन गुरुशिष्य भेट शिवकलाकार डॉ. सागर फापाळे यांनी साकारली. पंढरपूर येथे होणाऱ्या गोल रिंगणाची आठवण यानिमित्ताने होऊन ठाणे देखील प्रति पंढरपूर झाले, अशी प्रतिक्रिया काही वारकऱ्यांनी दिली.

या वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज हभप भानुदास मोरे देहूकर यांचे किर्तन झाले. वारीत छत्रपती शिवाजी महाराज, वारकरी संप्रदायातील संत, महात्मे यांची वेशभूषा केलेले कलावंत सहभागी झाले होते.

सदर सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याध्यक्ष तथा मुंबई महापालिका नगर अभियंता नवनाथ घाडगे, जल अभियंता खराडे, काकडे, निवासी जिल्हाधिकारी संदीप माने, ठामपा उपायुक्त शंकर पाटोळे, माजी सभापती राम रेपाळे, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, कविता पाटील, माजी परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव मुळुक, ‘ठाणे ओबीसी एकीकरण समिती'चे अध्यक्ष प्रफुल्ल वाघोले, ‘मराठा सेवा संघ'चे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे, ‘युवा सेना'चे नितीन लांडगे, निखिल बडजुडे, हभप विलास महाराज फापाळे, भारतीय सेनेतील राजू पाटील, जयदीप भोईर, ‘सैनिक फेडरेशन'चे सर्व पदाधिकारी, यादव समाज ट्रस्ट अध्यक्ष जितेंद्र यादव, रामानंद यादव, रामाश्रय यादव, राम यादव, लोहार समाजाचे बळीराम खरे, ‘शिवसेना'चे राजेंद्र देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
वारी सोहळ्याला एनकेटी महाविद्यालयाचे विश्वस्त तथा समाजरत्न नानजीभाई ठक्कर यांचे विशेष सहकार्य लाभले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षण संस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव