नवी मुंबईतील गावा-गावात पारंपारिक पध्दतीने दहीहंडी उत्सव साजरा

वाशी : दहीहंडी  म्हटल्यावर प्रत्येक गोविंदामध्ये उत्साह संचारतो. गोविंदांची पथके महिनाभरापासूनच तयारीला लागतात. या सहासी खेळात रस्त्यांवर उंच उंच मनोरे पाहायला मिळतात. रस्त्यांवर दहीहंडी फोडताना गोविंदांना मोठी मेहनत घ्यावी लागते. अनेकदा ८ ते ९ थर रचुनही हंडी फुटत नाही. मात्र, मागील नवी मुंबईतील गावा-गावात दहीहंडीचा सण आजही तितक्याच जोशाने आणि पारंपरिक पध्दतीने साजरा केला.

नवी मुंबईतील गांवठाणात आगळी-वेगळी दहीहंडीचा मजा पाहायला मिळते. दहीहंडीचा सदर उत्साह पाहण्यासाठी बघ्याची तोबा गर्दी होते. मानवी थर न रचता दहीहंडी फोडली जाते. शिरवणे गावात तर मागील ५० हुन अधिक वर्षापासून पासून डोक्याने दहीहंडी फोडली जाते. काही उंचीवर दहीहंडी बांधली जाते, त्यानंतर गोविंदा पळत पळत उंच उडी घेत डोक्याने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतो. शिरवणे गावातील मानाची दहीहंडी म्हणून आजही सदर दहीहंडी प्रचलित आहे. आग्रोळी  गावातील पारंपरिक दहीहंडी उत्सवात हंडी फोडणाऱ्या गोविंदाला फेकून डोक्याने हंडी फोडण्याची प्रथा आहे. काहीशा उंचीवर दहीहंडी बांधून मग गावातील तरुणाई ज्याला हंडी फोडायची आहे, त्याला दहीहंडीच्या दिशेने हलकेसे फेकून देतात आणि त्यानंतर त्या गोविदाने नेम धरत डोक्याने हंडी फोडायची असते.

दिवाळे गावात देखील गावकीची जुनी दहीहंडी देवळात फोडली जाते. तर दुसरी हंडी पळत पळत जावून डोक्याने फोडली जाते. नवी मुंबई शहर जरी स्मार्ट सिटी म्हणून जरी ओळखले जात असले तरी इथल्या स्थानिक भूमीपुत्रांच्या सणावारांची प्रथा आजही रुढी परंपरेला धरुनच सुरुच आहेत.

आगरी-कोळी समाजाकडून आजही सर्वच सणवार मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. एक गांव एक दहीहंडी अशी प्रथा सर्वच गावात पाळली जाते. कोणी बोली दही हंडी लिलाव पध्दतीने साजरे करतात, तर कोणी चोर हंडी, डोळ्याला पट्टी बांधून तर कोणी डोक्याने हंडी फोडतात. सर्वात आधी गावकीच्या बोली दही हंडीची  सुरुवात गावातील मंदिरातून केली जाते. १ हजार रुपयापासून सुरु होणारी बोली एक-दीड लाखावर थांबली जाते. त्यानंतर बोली जिंकल्यानंतरच जो काही पैसा असतो तो गावकी धार्मिक कार्यासाठी खर्च करतात.

घणसोली गावात बोली दहीहंडीची परंपरा नसली तरी गावातील सहा आळ्या एकत्रित येऊन गोकुळ अष्टमीचा उत्सव साजरा करतात. यंदा या उत्सवाचे १२३ वे वर्ष असून यावेळी गावातील पाटील आळीला गावकीची मानाची हंडी फोडण्याचा मान मिळाला आला. याशिवाय कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, पावणे, आदि गावांमध्ये बोली दहीहंडीची चुरस पहायला मिळाली.

नवी मुंबईतील सर्वात जुनी आणि पहिली वर्षानुवर्ष परंपरेनुसार कोपरखैरणे गावात बोली हंडीची परंपरा चालत आली आहे. यंदा देखील या हंडीत बोलीसाठी मोठी चुरस पहावयास मिळाली असून मयुर ज्ञानेश्वर पाटील यांनी २ लाख ५५ हजार ५०१ अशी विक्रमी बोली लावून मानाची हंडी फोडली.

तुर्भे गावातील बोली दहीहंडी हनुमान मंदिर जवळ बाळ-गोपाल आणि वृध्द, ग्रामस्थ महिला यांच्या उपस्थितीत परंपरेनुसार चालत आलेली बोली हंडी यंदा तुर्भे गांवचे ग्रामस्थ बारशा गणा घरत  यांची नात रुनी घरत हिच्या नावाने ९० हजार रुपयांची बोली लावून फोडण्यात आली.

कोपरी गावात देखील श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण पारंपरिक पध्दतीने साजरा झाला. यावेळी रात्री श्रीकृष्ण अध्याय वाचनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गीत आणि आरती करुन जन्मष्टमी साजरी करण्यात आली. दहीकाला दिवशी गावातील गांवदेवी मंदिरात पारंपरिक बोली दहीहंडी समाजसेवक योगेश मनोहर भोईर, ठाकूर यांनी ३३ हजार  ३३३ रुपये बोली लावून फोडली.

नेरुळ गावात देखील गांवदेवी प्रासादिक भजन मंडळ तर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राजेश पांडुरंग म्हात्रे यांनी २१ हजार रुपये बोली लावून मानाची हंडी फोडली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 भूस्खलन प्रवण बेलापूर टेकडीवरील ३० बेकायदेशीर धार्मिकस्थळांवर कारवाई करा