नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
सांडपाण्याचा खाडीत विसर्ग; दुर्गंधीमुळे मुर्बी ग्रामस्थ संतप्त
खारघर : खारघर, सेक्टर-१९ मुर्बी गाव सर्कल लगत मलनिःस्सारण वाहिनीचे चेंबर फुटून सांडपाणी थेट खाडीत जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे मुर्बी ग्रामस्थांमध्ये महापालिका विरोधात असंतोष पसरला आहे.
खारघर वसाहत मधील सांडपाणीसाठी ‘सिडको'ने खारघर, सेक्टर-८, १२ आणि १६ अशा ३ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. खारघर, सेक्टर-२६ ते २८ वसाहत मधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी ‘सिडको'ने रांजणपाडा गावाकडून सेक्टर-१६ वास्तुविहार, सेलिब्रेशनच्या बाजुला सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. मुर्बी गाव सर्कल लगत मलनिःस्सारण वाहिनी चेंबर उभारण्यात आले आहे. सदर चेंबर फुटून खारघर, सेक्टर-२६ ते २८ वसाहत मधील सर्व सांडपाणी जवळच असलेल्या खाडीत जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
सांडपाण्यामुळे अनेक वेळा मासळी मरण पावल्या असून महापालिकेने सांडपाणी खाडीत सोडून खाडी प्रदुषित करु नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेकडून २ महिन्यात २ वेळा चेंबरचे बांधकाम करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे चेंबर फुटून सांडपाणी थेट खाडीत जात असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
खारघर परिसरातील खाडीत देश-विदेशातील पक्षी येत असतात. तसेच खाडी परिसर स्वच्छ असावे यासाठी खारघर मधील पर्यावरण प्रेमींनी अनेक वेळा स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गोळा करुन ते महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, खारघर सेक्टर-१९ मुर्बी गांव येथे सांडपाणी वाहून नेणारे चेंबर फुटून सांडपाणी थेट खाडीत सोडले जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे चेंबर फुटण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. महापालिका आणि सिडको अधिकाऱ्यांने सांडपाणी समस्या दूर करावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल.
-ऋतिक नावडेकर, अध्यक्ष-प्रभाग क्र.४, मनसे-खारघर तथा ग्रामस्थ मुर्बी गांव.
मुर्बी गावालगत असलेल्या चेंबरचे काम ३ वेळा केले गेले. मात्र, सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे चेंबर फुटण्याचे प्रकार घडत आहे. लवकरच दुरुस्ती केली जाईल.
-प्रीतम पाटील, प्रमुख-एसटीपी प्रकल्प, पनवेल महापालिका.