‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' उपक्रम

पनवेल : पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती विक्री केंद्र पनवेलमध्ये सुरु करण्यात आले आहे. नागरिकांना या गणेशमुर्ती विक्री केंद्रामध्ये पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्ती माफक दरात मिळणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्रास भेट देऊन गणेशमुर्ती खरेदी कराव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ'च्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व सण आणि उत्सव पर्यावरणपूरक साजरे करणे बंधकारक आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी माझी वसुंधरा ४.० अंतर्गत यावर्षीही ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम हाती घेतली आहे. या अतंर्गत उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना माफक दरात शाडू मूर्ती उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल शहरातील कुंभारवाड्यातील मुर्तीकारांना शाडुपासून गणेशमुर्त्या तयार करण्याबाबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकातर्फे १० गणेश मुर्तीकारांना जुलै महिन्यात मोफत १२ टन शाडुची माती उपलब्ध करुन देण्यात आली होती.

पनवेल मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीजवळ पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती विक्री केंद्रामध्ये गिरीधर मूर्ती प्रशिक्षण-कला केंद्र , श्री गणेश कला केंद्र, युसुफ मेहर अली सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानातून मुर्तीकारांनी तयार केलेल्या मुर्त्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या केंद्राला भेट देऊन आपली पर्यावरणपूरक गणेशमुर्ती ॲडव्हान्समध्ये बुकिंग करुन ठेवावी, असे आवाहन आयुक्त चितळे यांनी केले आहे.

गणोशोत्सव साजरा करताना केवळ पर्यावरणपूरक गणेशमुर्तीच नाही तर गणपती बाप्पाची सजावट देखील पर्यावरणपूरक करून गणेशाची आराधना आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी अशा दोन्हींची मंगलमय सांगड घालून या वर्षीच्या गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करुया.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सांडपाण्याचा खाडीत विसर्ग; दुर्गंधीमुळे मुर्बी ग्रामस्थ संतप्त