नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरण्याच्या उंबरठ्यावर

पोलीस यांच्यामार्फत नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

नवी मुंबई : नवी मुंबई शहराला जलसमृद्धता बहाल करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता 190.890  द.ल.घ.मी. इतकी असून, विसर्ग पाणी पातळी तलांक 88.00 मी. इतकी  आहे. 25 ऑगस्ट मोरबे धरणात  पाणी  पातळी तलांक 87.40 मी. पेक्षा जास्त झालेली आहे.

मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरू असून असाच पाऊस सुरु असल्याने धरण कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु राहून धरणाची पाणी पातळी 87.85 मी. इतकी  झाल्यास, धरणाचे दोन्ही  वक्राकार दरवाजे  कोणत्याही  क्षणी उघडण्यात येऊन, जादाचे पाणी मूळ धावरी नदी पात्रात सोडण्यात येईल असे खालापूर तहसीलदार व स्थानिक पोलीस प्रशासन यांस नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. तसेच त्यानंतरही, धरणाची पाणी पातळी 88.00 मी. तलांक इतकी राखण्यासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग करणेत, येईल असेही सूचित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने, धावरी नदीच्या तीरावरील विशेषत: चौक, जांभिवली, आसरे, धारणी, तुपगाव, आसरोटी, कोपरी या नदीकाठावरील व पाताळगंगा नदीवरील इतर गावांतील  संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना व गावातील नागरिकांना धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानंतर, नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून  सतर्कतेबाब अनुषंगिक सुचना देण्याचे कळविण्यात आलेले आहे. तसेच या दरम्यान कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांनी व पर्यटकांनी प्रवेश न करण्याबाबत आणि नदीच्या पात्रात उतरण्यास व पोहण्यास मज्जाव करणेबाबत तहसीलदारांच्या व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात असेही सूचित करण्यात आले आहे.

दरम्यान,  प्रतिदिन 450 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरत असल्याने ही नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सीबीडी उड्डाणपुलाखाली बैठक व्यवस्था-प्रवासी निवारा शेड सुविधा