दहीहंडी, गोपाळकाळा सणासाठी गाव, गावठाणे सज्ज

वाशी : नवी मुंबई मधील शहरी भागात दहीहंडी सणाला मानवी थर लावण्यात चुरस रंगते. मात्र, याच नवी मुंबई शहरातील गाव, गावठाण मध्ये गावकीची बोली हंडी फोडण्यासाठी बोलीची चुरस लागते. ‘हायटेक सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात आज देखील गावकीच्या ‘बोली दहीहंडी'ची परंपरा जोपासली जात आहे.

आगरी-कोळी समाज तसा सण, उत्सवप्रिय समाज म्हणून ओळखला जातो. त्यातच आगरी-कोळी समाज परंपरा, रुढी यांची कास कायम धरत सण, उत्सव साजरा करत आहे. गोकुळ अष्ट्‌मी निमित्ताने देखील ठिक-ठिकाणी सात दिवस आधी पासूनच नवी मुंबई शहरातील ठराविक गावांमध्ये हरीनाम सप्ताह आयोजित केला जातो. या सप्ताहात संपूर्ण गावातील ग्रामस्थ आवर्जून हजेरी लावतात. हरीनाम सप्ताहात सात दिवस गावातील मंदिरात भजन, कीर्तन या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात ‘गोकुळ अष्टमी'च्या रात्री गावातील मंदिरात गावकी एकत्र येऊन श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा करते. त्यासाठी पाळणा सजवून गावातील महिला वर्ग पाळणा गाऊन बारा वाजता जन्म उत्सव साजरा करतात. त्यानंतर गावातील तरुण वर्गाकडून दोन ते तीन थरांचा मनोरा रचून दहीहंडी फोडली जाते. मग प्रसाद म्हणून दही आणि सुंढवडा दिला जातो. त्यानंतर  दुसऱ्या दिवशी गावातील मंदिर परिसरात बोली दहीहंडीच्या बोल्यांचा कार्यक्रम सुरु होतो. बोली दहीहंडीसाठी १ हजारांपासून ते एक -दीड लाखापर्यंत बोली लावली जाते. गावकीची मानाची बोली हंडी फोडल्यानंतरच इतर हंड्या फोडल्या जाण्याची परंपरा सुमारे शेकडी वर्षा पूर्वी पासून नवी मुंबई शहरात  जोपासली जात आहे. शहर बदलते तसा काळ बदलला जातो. मात्र, गावकीच्या मानाच्या बोली हंड्यांची परंपरा अजूनही नवी मुंबई शहरात पूर्वीसारखीच तग धरुन आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरण्याच्या उंबरठ्यावर