स्वच्छता प्रश्नी केडीएमसी उपायुक्त ॲक्शन मोडवर

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील स्वच्छता प्रश्नी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील ॲक्शन मोडवर आल्याचे पहायला मिळत असून प्रभागात अस्वच्छता आढळून आल्याने स्वच्छता निरीक्षकांसह सफाई कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्फत महापालिकेच्या प्रभागक्षेत्र कार्यालय परिसरात प्रत्यक्ष भेट देवून महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

या भेटी दरम्यान उपायुक्त पाटील यांनी प्रभागक्षेत्र स्तरावर कार्यरत स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक यांच्या दैनंदिन कार्यवाहीचा आढावा घेवून प्रभागात कार्यवाही करताना येणाऱ्या अडचणी, समस्यांचे निराकरण करण्याकामी मार्गदर्शन केले. तसेच परिसराची पहाणी करुन स्वच्छतेकामी त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.

सदर भेटी दरम्यान महापालिकेच्या ब-प्रभाग क्षेत्र कार्यालय, क-प्रभाग क्षेत्र, फ-प्रभाग क्षेत्र, ग-प्रभाग क्षेत्र आणि ई-प्रभाग क्षेत्र कार्यालय पसिरात भेट दिली असून यापैकी ग आणि ई प्रभाग क्षेत्र परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता आढळून आले. त्यामुळे संबंधित ३ स्वच्छता निरीक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला असून यासह उशीरा आलेल्या एकूण ९ सफाई कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत.

प्रभाग क्षेत्रातील खंबाळपाडा वाहनतळ येथे उपायुवत अतुल पाटील यांनी भेट दिली असता वाहनतळाच्या बाजुस ९ गाड्या येऊन थांबलेल्या दिसून आल्या. या वाहन चालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी अहवाल मागविण्यात आला आहे.

आगामी कालावधीमध्ये अशा प्रकारे नियमीत भेटी देवून महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रभागातील स्वच्छता विषयक समस्या तातडीने सोडविण्याकामी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. तसेच विभागातील जे अधिकारी, कर्मचारी दैनंदिन कार्यवाही करताना टाळाटाळ अथवा हयगय करताना आढळून आल्यास संबंधितांविरुध्द तातडीने कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. - अतुल पाटील, उपायुवत-घनकचरा व्यवस्थापन विभाग, केडीएमसी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 दहीहंडी, गोपाळकाळा सणासाठी गाव, गावठाणे सज्ज