नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
कचरा वेचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण
भाईंदर : मिरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' अंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील कचरा वेचकांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
मिरा-भाईंदर महापालिकेचे कार्यक्षेत्र ७९ चौरस किलोमीटर इतके आहे. साधारण १४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात ४५० ते ५०० मेट्रिक टन कचरा रोज निर्माण होत आहे. महापालिकेच्या एकूण ६ प्रभाग समितीच्या २ झोनमध्ये विभागणी करुन दैनंदिन साफसफाईसाठी कंत्राटी कर्मचारी आणि वाहनाद्वारे दररोज घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण करून उत्तन येथील प्रक्रिया प्रकल्पात तसेच बायोगॅस प्रकल्पामध्ये त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
यासोबतच स्वच्छता निरीक्षक यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार सध्या महापालिका क्षेत्रात एकूण १३१ कचरा वेचक कार्यरत आहेत. सदर कचरा वेचक वैयक्तिकरित्या प्लास्टिक कचरा गोळा करुन स्थानिक विक्रेत्यांना अगदी कमी किंमतीत विकत आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजच्या उपजीविकेचा प्रश्न शाश्वत बनणे खऱ्या अर्थाने कठीण झाले आहे. आयुक्त संजय काटकर यांनी सदर बाब लक्षात घेत महापालिकेचे कचरा वेचकांना समृध्द आणि सक्षम करण्यासाठी विशेष रोजगार मेळावा नगर भवन येथे आयोजित केला होता. या मेळाव्याला मिरा-भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रातील कचरा वेचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
बिसलरी या कंपनीच्या सहकार्याने सदर कचरा वेचकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना समृध्द आणि सक्षम करण्यासाठी त्यांचे महापालिकाद्वारे बचत गट तयार करण्यात येणार असून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच बिसलेरी मार्फत सीएसआर अंतर्गत MRF (Material Recovery Facility) प्लांट उभारण्यात येणार असून शहरातील प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करून शहरातील डम्पिंगला जाणारा प्लास्टिक कचरा कमी होणार आहे.
कचरा संकलकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्याचा अभिनव उपक्रम मिरा-भाईंदर महापालिका मार्फत राबविण्यात येणार आहे. शहरातील गरीब-गरजू कचरा वेचकांनी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण अधिक शाश्वत करण्यासाठी पुढे येऊन या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-संजय काटकर, आयुवत-मिरा भाईंदर महापालिका.