दहीहंडी, गणेशोत्सव मंडप परवानगीचे अर्ज विनाविलंब मंजूर करावेत

ठाणे : दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव यांच्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने आलेले मंडप परवानगीचे अर्ज सहायक आयुक्तांनी विनाविलंब मंजूर करावेत, असे निर्देश ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. दहीहंडीच्या मंडपासाठी ५१ तर गणेशोत्सवाच्या मंडपांसाठी १५७ अर्ज आले असून त्यांच्या परवानगीची प्रक्रिया सुरु झाली आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गणेशोत्सव तयारीबाबत केलेल्या सुचनांनुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी २२ ऑगस्ट रोजी घेतला. सदर बैठकीस उपायुक्त मनिष जोशी, जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, मनोहर बोडके यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, शुभांगी केसवानी, आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंडळांकडून परवानगीसाठी आलेले अर्ज सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल यांच्याकडील आवश्यक परवानगी, ना-हरकत दाखला घेवून प्रभाग समिती स्तरावर तत्काळ मार्गी लावावेत. किती परवानगी देण्यात आली, त्यात काही विलंब होत नाही ना? याचा सहायक आयुक्त आणि परिमंडळ आयुक्त यांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घ्यावा, असे अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी सांगितले.

महापालिका मुख्यालयात गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार विविध विषयांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. त्यात मोठे आणि अंतर्गत असे सगळे रस्ते खड्डेमुक्त राहतील यांची दक्षता बांधकाम विभागाने घ्यायची आहे. तसेच गणेश मूर्तीच्या आगमन-विसर्जन मार्गातील झाडांच्या फांद्यांची छाटणी वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी उद्यान विभागाची आहे. त्यात कोणतीही हयगय नको, असेही अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी स्पष्ट केले.

विसर्जन घाट आणि परिसर येथील व्यवस्था यांचीही माहिती बैठकीत देण्यात आली. मंडळांनीही आवश्यक त्या सर्व परवानगी वेळेत घ्याव्यात. त्यापैकी मंडप परवानगी मंडळांच्या दर्शनी भागात लावावी. तसेच वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यास मंडळांनी सक्रिय साथ द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे.

महापालिकेच्या आरास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन...
ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी दरवर्षी महापालिका आरास स्पर्धेचे आयोजन करते. त्यात एकूण ८ पारितोषिके दिली जातात. प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७५०० रुपये आणि तृतीय क्रमांकास ६५०० रुपये असे पारितोषिक असते. स्पर्धेतील सहभागासाठी २ सप्टेंबर पर्यंत मंडळांना माहिती-जनसंपर्क विभागाच्या कार्यालयात अर्ज सादर करता येतील. या स्पर्धेचे परीक्षण त्रयस्थ परीक्षकांमार्फत केले जाते. सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

25  वर्षांपासून मोरबे धरणातील गाळ काढला नाही - आरटीआय माहिती