नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
दुकानांपुढील विनापरवाना पावसाळी शेड जमीनदोस्त
दुकानदार, व्यापारी वर्ग संतप्त
खारघरः खारघर मध्ये काही दुकानदारांनी दुकान समोर अनधिकृतपणे उभारलेल्यात पावसाळी शेड पनवेल महापालिका तर्फे जेसीबी लावून हटविण्यास सुरुवात करण्यात आल्यामुळे दुकानदार आणि व्यापारी वर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे.
पावसाळ्यात व्यापाऱ्यांचे नुकसान होवू नये, याकरिता महापालिकेकडून परवानगी घेवून दुकान समोर शेड उभारली जाते. त्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, खारघर मधील बहुतांश दुकानदार आणि व्यापारी वर्गाने महापालिकेकडून परवानगी न घेताच शेड उभारण्यात आल्याचे निदर्शनास येताच महापालिका अधिकाऱ्यांनी २२ ऑगस्ट रोजी खारघर सेक्टर-१२ मध्ये मोहीम राबवून अनधिकृत पावसाळी शेड हटविण्यास सुरुवात केल्यामुळे दुकानदार आणि व्यापारी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेने नोटीस देवून अनधिकृत पावसाळी शेड हटविण्याची कारवाई करणे आवश्यक असताना नोटीस न देता पावसाळी शेड हटविणे चुकीचे आहे, असे दुकानदार आणि व्यापारी यांनी सांगितले.
खारघर मध्ये फेरीवाल्यांनी पदपथावर अतिक्रमण करुन व्यवसाय थाटला आहे. मात्र, बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई न करता पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर भरणा करीत असलेल्या दुकानदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता दुकानाच्या समोरील पावसाळी शेड थेट जेसीबी लावून काढण्याची कारवाई करणे चुकीचे आहे. - विजय पाटील, अध्यक्ष - व्यापारी असोसिएशन, सेक्टर-१२, खारघर.
पनवेल महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता व्यापारी आणि दुकानदारांनी उभारलेल्या अनधिकृत शेड हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे.- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी - खारघर, पनवेल महापालिका.
पनवेल महापालिकेने नोटीस पाठवून अथवा तोंडी माहिती दिली असती तर दुकानदार, व्यापारी वर्गाने स्वतःहून दुकान समोरील शेड हटविली असती. थेट जेसीबीद्वारे पावसाळी शेड काढण्याची कारवाई करताना वीज वायर तुटून, शॉक लागून जीवितहानी झाली असती तर कोण जबाबदार राहिले असते.या संदर्भात महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. महापालिकेकडून अन्याय पूर्वक कारवाई केली जात असेल तर ‘खारघर बंद' आंदोलनाचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे, असे खारघर मधील काही दुकानदारांनी सांगितले.