राखी पौर्णिमेनिमित्त पैठणी देवून कवयित्रींचा केला सन्मान

नवी मुंबई : छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण, बंध भावनांचे समुह, नवी मुंबई साहित्य परिषद आणि शिवतुतारी प्रतिष्ठान, नवी मुंबई संचलित कविता डॉट कॉम च्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त विवेकानंद संकुल, सानपाडा येथे खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून सौ. सुलभा वाघ, सौ.मोना माळी आणि ऋतुजा गवस या तीन भगिनींना पैठणी साडीची ओवाळणी भेट देण्यात आली. सुलेखनकार विलास समेळ काका यांनी उपस्थितांना बुकमार्क भेट दिले तर आप्पा ठाकूर यांनी दोन कवींना ग्रंथ देवून सन्मानीत केलं.

महाराष्ट्रातील जवळपास तीस कवींनी सहभाग नोंदवत विविध विषयांवरील कविता सादर करत राखीपौर्णिमा साजरी केली. प्रवेशद्वारावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांनी रेखाटलेली रांगोळी स्वागत करत होती. दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनानंतर सुप्रसिद्ध गझलकार आप्पा ठाकुर, छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी आणि शिवव्याख्याते रविंद्र पाटील यांना राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका ऋतुजा गवस यांनी मान्यवरांचा परिचय करून देत नवी मुंबई साहित्य परिषदेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदकुमार जोशी यांनी मराठी भाषेचा वसा आणि वारसा जपणाऱ्या कविता डॉट कॉम च्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कवयित्री, रंगकर्मी कांचन प्रकाश संगीत यांनी कविता डॉट कॉमच्या उपक्रमाचे कौतुक करत कविता सादर करतानाच कवितेचे महत्त्वही विशद केले व प्रसार भारती कार्यक्रमाच्या विविध आठवणी सांगितल्या.  खुल्या कविसंमेलनात उद्‌घाटन सत्राचे सुत्रसंचालन नारायण लांडगे पाटील यांनी करताना कार्यक्रमात रंगत भरली. समारोप सत्रात शंकर गोपाळे यांनी सुत्रसंचलन करत उपस्थितांना खळखळून हसवले. कविता डॉट कॉम चे निर्मिती सुत्रधार प्रा. रविंद्र पाटील यांनी कविता डॉट कॉम चे मासिक संमेलनाचे प्रयोजन विषद करत कविता डॉट कॉम ची भुमिका मांडली.  लोककवी जितेंद्र लाड यांनी नियोजनाची भुमिका निभावली. तंत्रस्नेही वैभव वऱ्हाडी यांनी हा कार्यक्रम कॅमेऱ्यात बंदिस्त केला. याप्रसंगी रांगोळीकार श्रीहरी पवळे ,विवेकानंद संकुल प्रमुख विलास वाव्हळ, मुख्याध्यापक ऋतुजा गवस, सौ.मनीषा पाटील,  निलेश पालकर, अनिसचे अशोक निकम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 लाडक्या बहिणीच्या खात्यात योजनेचे पैसे जमा