नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
नारळी पौर्णिमा निमित्त आगरी-कोळ्यांच्या उत्साहाला उधाण
वाशी : नवी मुंबईतील कोळीवाड्यात परंपरागत चालत आलेल्या नारळी पौर्णिमेला कोळीगीतांच्या तालावर थिरकत मिरवणूक काढून दर्याराजाला नारळ अर्पण करुन नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर कोळी बांधवांनी आपल्या होड्या समुद्रात सोडल्या. यावेळी आगरी कोळ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.
शहरात होणाऱ्या विकासामुळे तसेच प्रदूषणाने मासेमारीवर परिणाम जाणवत असला तरी कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमेचा उत्साह, संचार आजही कायम राहिलेला आहे. ‘सण आयलाय गो आयलाय गो नारळी पुनवेचा” अशी गाणी म्हणत ढोल ताशाच्या तालावर थिरकत नवी मुंबईतील आगरी कोळी बांधवानी भव्य मिरवणूक काढली होती.
नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी गांव, जुहूगाव, बोनकोडे, कोपेरखैरणे, तळवली गाव, दिवा कोळीवाडा, ऐरोली गांव, नेरुळ गांव या गावांमध्ये नारळी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये दिवाळे कोळीवाड्यात आणि सारसोळे गावात नारळी पौर्णिमेचा वेगळाच थाट पहावयास मिळाला.
या दिवशी नवी मुंबई शहरातून साधारणतः ८०० ते -९०० होड्या मासेमारीकरिता पाण्यात उतरतात. यामध्ये दिवाळे कोळीवाड्यात सर्वाधिक ४०० होड्या मासेमारी करीत आहेत. त्यानंतर सारसोळे, वाशी जेट्टीचा नंबर लागतो. वर्षभर आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आणि आपला सांभाळ करणाऱ्या दर्या राजाला नारळ अर्पण पुजा करून नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
जाळ्यातील मासळी ३० टक्क्यांनी घटली...
नवी मुंबई शहर खाडीकिनारी वसले आहे. त्यामुळे येथील स्थानिकांचा शेती आणि मासेमारी पारंपरिक व्यवसाय आहे. मात्र, वाढते नागरीकरण पाहता खाडीत नव-नवीन पुल बांधले जात आहेत. पुलांच्या बांधकामांमुके येथील मासळी प्रजनानवर परिणाम होत आहे. आधी विमानतळ भराव, त्यानंतर न्हावा-शिवडी सी-लिंक, नवीन वाशी खाडी पूल तसेच औद्योगिक वसाहतीतील रसायन प्रदुषण या साऱ्यांमुळे येथील मासेमारीवर परिणाम झाला असून मासळी ३० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे मच्छिमारांना कधी कधी रिकाम्या हाताने परत यावे लागते, अशी माहिती ‘कोलवाणी मित्र मंडळ'चे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी दिली.
दरम्यान दर्या सागरात मच्छिमार मासेमारीसाठी जातात. अशा वेळी समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मच्छिमारांचे संरक्षण व्हावे म्हणून ‘संदीप नाईक प्रतिष्ठान'तर्फे सारसोळे जेट्टीवर लाईफ जॅकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘भाजपा'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी नगरसेवक सुरज पाटील, गिरीष म्हात्रे, आदि उपस्थित होते.