नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
ठाणे येथे राष्ट्रीय ‘छायाचित्र स्पर्धा-प्रदर्शन'
प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले
ठाणे : छायाचित्रकारांनी टिपलेले विश्व अनुभवण्याची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यानी पुढील ४ दिवसात छायाचित्र प्रदर्शन पहावे, असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
ठाणे महापालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा-प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सरनाईक यांनी १७ ऑगस्ट रोजी सकाळी केले. याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती जनसंपर्क) उमेश बिरारी, उपायुक्त (क्रीडा) मिनल पालांडे, ‘ठाणे दैनिक पत्रकार संघ'चे अध्यक्ष आनंद कांबळे तसेच निलेश पानमंद, विभव बिरवटकर, प्रफुल्ल गांगुर्डे, अनुपमा गुंडे, विकास काटे, अशोक गुप्ता, पंकज रोडेकर, आदि पदाधिकारी तसेच ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशी उपस्थित होते. उद्घाटनानंतर आ. प्रताप सरनाईक आणि आ. निरंजन डावखरे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले आणि छायाचित्रकारांचे कौतुक केले.
‘जागतिक छायाचित्र दिन' निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन-स्पर्धा यांचे आयोजन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका सांस्कृतिक क्षेत्रातही नेहमी आघाडीवर असते. धर्मवीर आनंद दिघे आणि वसंत डावखरे यांनी रुजवलेली सदर संस्कृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम ठेवली आहे. त्यामुळेच असे चांगले उपक्रम आयोजित केले जातात. ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ'नेही सदरचा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरावी, अशा शुभेच्छा याप्रसंगी आमदार सरनाईक यांनी यावेळी दिल्या.
छायाचित्र काढायला मेहनत लागते. नेमका क्षण टिपणे कौशल्य आहे. त्याचेच प्रत्यंतर प्रदर्शन पाहताना आले. छायाचित्रकारांना व्यवसायाचे संरक्षण मिळावे यासाठी महापालिका आणि सरकार यांनी विचार करावा, अशी सूचना आ. निरंजन डावखरे यांनी केली.
छायाचित्रकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी सदर प्रदर्शन भरविण्यात आले. स्पर्धा घेण्यात आली. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद लाभला आहे. आता नागरिकांनी सदर कला प्रत्यक्ष भेट देवुन पहावी, असे आवाहन ‘ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ'चे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी याप्रसंगी केले.
या निमित्ताने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट होते. शिवाय महाविद्यालयीन गटही होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २० ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे.
प्रदर्शन नागरिकांसाठी विनामुल्य...
ठाणे महापालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले छायाचित्र प्रदर्शन २० ऑगस्ट पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ९ या काळात नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले आहे.