खारघर मधील अनधिकृत ३५ बुस्टर पंप जप्त

खारघर : खारघर सेक्टर-३४ आणि सेवटर-३५ मधील गृहनिर्माण  सोसायट्यांमध्ये जलवाहिनीवर बेकायदेशीरपणे लावलेले अनधिकृत बुस्टर पंप हटविण्याची मोहीम सिडको पाणी पुरवठा विभागाने सुरु केली असून, गेल्या आठवड्याभरात ३५ बुस्टर पंप जप्त करण्यात आले  आहेत.

दरम्यान, सिडको अखत्यारीतील तळोजा, कामोठे, कळंबोली, पनवेल, करंजाडे, उलवे आणि द्रोणागिरी आदी नोड मधील गृहनिर्माण सोसायटींमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेले बुस्टर पंप तात्काळ काढावे अन्यथा अनधिकृत बुस्टर पंप असलेल्या हौसिंग सोसायटींवर कारवाई केली जाईल, असा इशारा सिडको तर्फे देण्यात आला आहे.

खारघर परिसरात नियमितपणे पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान, १ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात सिडको पाणी पुरवठा विभागाने रद्द केली असूनही, काही सेक्टर मधील सोसायटींमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सिडकोकडे प्राप्त होताच सिडको पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता खारघर सेक्टर-३४ आणि सेवटर-३५ मधील गृहनिर्माण  सोसायटींमध्ये सिडको जलवाहिनीवर बुस्टर पंप (मोटार) लावून पाणी घेत असल्याचे निदर्शनास येताच खारघर येथील काही सोसायटी मधील ३५ बुस्टर पंप ‘सिडको'ने जप्त केले आहे.

दरम्यान, तळोजा, कामोठे, कळंबोली, पनवेल, करंजाडे, उलवे आणि द्रोणागिरी वसाहतीत सिडको जलवाहिनीवर बुस्टर पंप लावून पाणी घेत असल्यास बुस्टर पंप तात्काळ काढण्यात यावेत, असे आवाहन करतानाच ‘बुस्टर पंपद्वारे पाणी घेणाऱ्या सोसायटींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल', अशी तंबी सिडको पाणी पुरवठा विभाग तर्फे देण्यात आली आहे.

खारघर सेक्टर-३४ आणि सेक्टर-३५ परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सिडको पाणी पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार तसेच अधिकाऱ्यांची भेट घेवून देखील पाणी समस्या दूर होत नाही. ‘सिडको'ने काही सोसायटीतील बेकायदा बुस्टर पंप काढले. मात्र, खारघर परिसरातील एका उच्चभ्रू टॉवर मध्ये सिडकोसह इतर अधिकारी वास्तव्यास आहेत. या सोसायटीमध्ये दहा एचपी क्षमतेची मोटार लावून पाणी चोरी केली जात आहे. मात्र, पाणी चोरी करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीकडे सिडको अधिकारी- कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. -जितेंद्र गुरखे, पदाधिकारी- किस्टोन सोसायटी, खारघर.

सिडको पाणी पुरवठा विभाग तर्फे खारघर सेक्टर-३४ आणि सेवटर-३५ मधील सिडको जलवाहिनीवर बुस्टर पंप लावून पाणी घेणाऱ्या काही गृहनिर्माण सोसायटींवर बुस्टर पंप जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पुन्हा बुस्टर पंप लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे. अनधिकृत बुस्टर पंप जप्त करण्याची मोहीम इतर सिडको नोड मध्ये देखील राबविण्यात येणार आहे. - प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी - सिडको. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे येथे राष्ट्रीय ‘छायाचित्र स्पर्धा-प्रदर्शन'