नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
एपीएमसी धान्य बाजारातील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण होण्याचा मार्ग मोकळा
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) धान्य बाजारातील मुख्य रस्ते वगळता इतर रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे एपीएमसी धान्य बाजारातील अंतर्गत भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाला अडथळे निर्माण होत आहेत.यावर उपाय म्हणून एपीएमसी धान्य बाजारातील निवडक रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी २० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
वाशी मधील एपीएमसी धान्य बाजार १६.२९ हेक्टर जमिनीवर वसला असून, या बाजारात ४१२ गाळेधारक आहेत. मुंबई उपनगरात एपीएमसी धान्य बाजारातूनच धान्य पुरवठा होत असल्याने या बाजारात रोज जड, अवजड, हलक्या वाहनांची वर्दळ असते. मात्र, एपीएमसी धान्य बाजारातील अंतर्गत भागात बहुतांशी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, खड्ड्यांमुळे वाहन चालकांना होणारा त्रास आता संपुष्टात येणार असून, एपीएमसी धान्य बाजार आवारातील पायाभूत सुविधांना एपीएमसी प्रशासन लवकरच सुरुवात करणार आहे.
एपीएमसी धान्य बाजारातील अतिरिक्त शॉप-कम-गोडाऊन संकुलातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच या संकुलातील विविध ब्लॉकच्या चढ-उतार पायथ्यालगत असलेल्या जुन्या गटारांची दुरुस्ती करुन फुटपाथ बनविण्यात येणार आहेत. विविध ठिकाणी असलेल्या आवक-जावक गेट लगतच्या भागात काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. विविध ब्लॉकच्या सार्वजनिक पॅसेजमधील पूर्व-पश्चिम बाजूस असलेले जूने कोलॅपीचल गेटस काढून त्याठिकाणी नवीन स्लायडींग गेटस बसविण्यात येणार आहेत. अतिरिक्त शीप-कम-गोडाऊन संकुलातील एम-एम अणि टी ब्लॉकच्या स्टेअरकेस परिसरातील दुरुस्ती तसेच विविध ब्लॉकच्या मध्यस्ता आणि फुटपाथ यामधील जागेत सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासह इतर पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती एपीएमसी धान्य बाजार संचालक निलेश विरा यांनी दिली.
एपीएमसी धान्य बाजारातील रस्ते दुरुस्तीसह पायाभूत सुविधांची कामे लवकरच सुरु होणार आहेत. या कामांसाठी २० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. - निलेश विरा, संचालक - एपीएमसी धान्य बाजार, वाशी.