प्लास्टिकमुक्त शहरासाठी स्वातंत्र्यदिनी संकल्प

नवी मुंबई : स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणशील शहर अशी नवी मुंबईची ओळख असून त्यादृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्तम सहभाग मिळत असून हाच उत्साह कायम राखत प्लास्टिकमुक्त मार्केट, प्लास्टिकमुक्त सोसायटी, प्लास्टिकमुक्त शाळा करण्याचा संकल्प स्वातंत्र्यदिनानिमित्त करुन निसर्गाची आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या एकल वापर प्लास्टिकला दैनंदिन जीवनातून दूर करुया, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले.  

‘घरोघरी तिरंगा' अभियानांतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यालयामध्ये आयोजित विशेष समारंभप्रसंगी आयुक्त शिंदे यांच्या हस्ते तिरंगा ट्रिब्युट उपक्रमांतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबियांचा तसेच १९७१ च्या युध्दात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते.  

नवी मुंबई शहर थोड्याशा प्रमाणातही अस्वच्छ होऊ नये यादृष्टीने नागरिकांनी सजग व्हावे आणि अस्वच्छ करणाऱ्यांना त्यापासून तिथल्या तिथे रोखावे, अशी संकल्पना नजरेसमोर ठेवून ‘टोक दो' असे नाविन्यपूर्ण अभियान आयुवत डॉ. कैलास शुाजाहीर केले. या अभियानाविषयीच्या माहितीपूर्ण ध्वनीचित्रफितीचे यावेळी अनावरण करण्यात आले. यावेळी नवी मुंबईतील वैशिष्ट्यांची ओळख करुन देणाऱ्या ‘इन्फिनिटी कॅनव्हास' या विशेष चित्रफितीचेही अनावरण आयुक्त शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मागील ३ महिन्यांमध्ये लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांवरील ध्वनीचित्रफित प्रदर्शित करण्यात आली.

विद्यार्थ्यांवर लहान वयापासूनच स्वच्छतेचे संस्कार व्हावेत याकरिता आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मतदान, कागदी आकाशकंदील निर्मिती, स्वच्छता दिंडी, स्वच्छता बुध्दीबळ अशा अभिनव उपक्रमांची माहिती देत यापुढील काळात विद्यार्थ्यांना घनकचऱ्यावरील संपूर्ण प्रक्रिया समजावी यादृष्टीने विशेष अभ्यास सहली आयोजित करण्यात येणार असल्याचे आयुवत म्हणाले. कचराकुंडीमुक्त शहर, कापडी कचरा पुनर्वापरासाठीचा करार, स्मार्ट शौचालय, मासिक वार्तापत्र अशा विविध नवीन बाबींवर त्यांनी माहिती दिली.

दरम्यान, शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या ‘झिरो प्लास्टिक स्टार्ट विथ मी' या उपक्रमात पहिल्या ३ क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी अनुक्रमे तानिया खातुन फरीद मल्लिक (नमुंमपा शाळा क्र.१८ सानपाडा), विघ्नेश नागेश खोत (नमुंमपा शाळा क्र.१० नेरुळ) आणि सागर देवजी चव्हाण (नमुंमपा शाळा क्र.११७ दिवाळे) या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 २७ गावातील मालमत्ता कर कमी