दोन महिन्यांनंतर वायू प्रदूषण; पुन्हा एकदा कोंडला नागरिकांचा श्वास?

वाशी : पावसामुळे मागील दोन महिने वातावरण स्वच्छ होते. मात्र, पावसाने थोडी उसंत घेताच  एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून १४ ऑगस्ट रोजी पहाटे पुन्हा एकदा प्रदूषित वायू सोडण्यात आले. त्यामुळे वाशी सेक्टर-२६ परिसरात धुके पसरुन उग्र आणि दर्प वास सुटला होता.

नवी मुंबई शहराच्या पूर्वेला विस्तीर्ण एमआयडीसी असून, या एमआयडीसी मध्ये मोठ्या संख्येने रासायनिक कारखाने आहेत. या कारखानदारांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम खुंटीला टांगून वारंवार  वायू आणि जल प्रदूषण केले जात आहे. वायू आणि जल प्रदूषणाने नवी मुंबई शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांद्वारे केवळ पाहणी दौऱ्यांचा फार्स राबवला जात आहे.

२०२३ मधील दिवाळी सणातील धूळ प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाची कान उघाडणी केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने देखील सतर्क होत विभागात धूळ शमन यंत्राद्वारे रस्त्यांवर पाणी फवारणी सुरु केली. मात्र, सदर उपाय यंत्रणा यावर्षी उन्हाळ्यात सुरु होती. यावर्षी पाऊस पडायला सुरुवात होताच वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांनी थोडी उसंत घेतली होती. मात्र, आता पावसाने थोडी उसंत घेताच एमआयडीसी मधील रासायनिक कारखानदारांद्वारे पुन्हा एकदा वायू प्रदूषण करण्याचे प्रकार सुरु झाले असून, १४ ऑगस्ट रोजी पहाटे पुन्हा एकदा वाशी सेक्टर-२६ परिसरातील नागरिकांना वायू प्रदूषणाचा प्रत्यय आला. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजून किती दिवस आमचा श्वास कोंडणार?, असा प्रश्न वाशी सेक्टर-२६ परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, तक्रारी करुनही वायू प्रदूषण थांबले असल्याचे चित्र दिसत नाही.त्यामुळे वायू प्रदूषणामुळे कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ परिसरात काही अनुचित प्रकार घडला तर त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे. -   संकेत डोके, उप जिल्हा प्रमुख - शिवसेना (उबाठा) नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 प्लास्टिकमुक्त शहरासाठी स्वातंत्र्यदिनी संकल्प