‘इकोफ्रेंडली तिरंगा रॅली'द्वारे देशभक्तीसह पर्यावरणशील संदेश प्रसारण

नवी मुंबई : संपूर्ण देशभरात ९ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा' अर्थात ‘हर घर तिरंगा' अभियानांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. यामध्ये विभागाविभागात तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आलेल्या असून त्यामध्ये विद्यार्थी, महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्यने सहभागी होत आहेत.

अशाच प्रकारचा ई-बाईक आणि सायकलसह इकोफ्रेंडली ‘तिरंगा रॅली'चा अभिनव उपक्रम मुख्यालय स्तरावर राबविण्यात आला. यामध्ये ५० हून अधिक नागरिक आणि स्वच्छताकर्मी यांनी आपल्या सायकल तसेच युलू ई-बाईक घेऊन सहभागी होत ‘भारतमाता की जय' या सोबतच स्वच्छतेच्या अनुषंगाने ‘निश्चय केला, नंबर पहिला' अशा घोषणा देत रॅली यशस्वी केली.

महापालिका मुख्यालय इमारतीपासून नेक्सस मॉलपर्यंत काढण्यात आलेल्या या ‘इकोफ्रेंडली तिरंगा रॅली'मध्ये नवी मुंबईतील अनेक सायकलप्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे-पाटील यांनी झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ केला. याप्रसंगी बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल, ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'च्या महापालिकेच्या वुमेन आयकॉन रिचा समित उपस्थित होत्या.

या ‘इकोफ्रेंडली तिरंगा रॅली'च्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश प्रसारित करण्यासोबतच ई-बाईक, सायकल अशा पर्यावरणपूरक वाहनांचा नागरिकांनी वापर वाढवावा आणि प्रदुषण रोखून पर्यावरण संरक्षणात आपला हातभार लावावा, असा संदेश प्रसारित करण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांनी सांगितले. यावेळी सामुहिकरित्या तिरंगा प्रतिज्ञा तसेच स्वच्छतेची शपथ घेऊन रॅलीची यशस्वी सांगता करण्यात आली.

याप्रसंगी उपस्थितांनी तिरंगा सेल्फी स्टँडवर मोठ्या प्रमाणात सेल्फी छायाचित्रे काढली. तसेच घरोघरी तिरंगा कॅनव्हासवर स्वस्वाक्षरी करुन ‘अभियान'मध्ये सहभाग नोंदविला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाढवण रस्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी