नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
पनवेल महापालिका तर्फे गणेशोत्सव नियोजन बैठक
पनवेल : सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात संपन्न होण्याकरिता संवाद आणि नियोजन करण्याच्या हेतुने महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या नेतृत्वाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात १२ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी पनवेल महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांना ऑनलाईन पध्दतीने परवाना देण्यात येणाऱ्या सुविधेची प्रात्यक्षिकासह माहिती सादर करण्यात आली. तसेच पर्यावरणपूरक गणोशोत्सव, सजावट स्पर्धा यावषियी माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस विभागातर्फे विविध सूचना गणेशोत्सव मंडळांना देण्यात आल्या.
सदर बैठकीप्रसंगी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक, महापालिका उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त संतोष वारुळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत तसेच महापालिका अधिकारी, सिडको अधिकारी, महावितरण, तहसिल आणि श्री गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिका पर्यावरणपूरक गणेश उत्सवावर भर देत असून शासनाच्या आणि महापालिकेच्या वतीने ‘विघ्नहर्ता पुरस्कार'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले. विसर्जन घाटावर आरास करुन महापालिका तर्फे विसर्जन घाट स्वच्छ ठेवण्यात येतील. गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वी महापालिका कार्यक्षेत्रातील मिरवणूक निघणारे रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात येईल. यासाठी अत्याधुनिक सिमेंट मिश्रणाचा वापर करण्यात येईल. सार्वजनिक गणेश मंडळांच्या वीज वितरण विभागाच्या विविध तक्रारी आहेत, या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वीज मंडळासोबत बैठक घेण्यात येण्याचे आश्वासन यावेळी आयुक्त चितळे यांनी दिले.
गणेश मंडळांनी स्टेज बनविताना वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. गणेश मुर्तीची काळजी घेण्याच्या दृष्टीने मंडळाचे २ स्वयंसेवक २४ तास मंडपामध्ये ठेवावे. मुर्तीची विटंबना होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच ध्वनीप्रदुषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगून सहाय्यक पोलीस आयुवत राजपूत यांनी मंडळांना आपल्या साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवण्याविषयी आवाहन केले. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी पर्यावरणपूरक गणोशोत्सवासाठी तयार केलेल्या सप्तसुत्रीची माहिती दिली. सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती सजावट स्पर्धा, मुर्तीदान आणि कृत्रिम तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन या महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याविषयी डॉ. विधाते यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकामध्ये उपायुक्त संतोष वारुरूळे यांनी गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पध्दतीने एक खिडकीयोजना अमंलात आणून त्यानुसार वाहतूक पोलीस, पोलीस स्टेशन, अग्निशमन विभाग, मालमत्ता विभाग यांच्या मार्फत मंडप परवानगी देणे आणि गणेशोत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्यसाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच यासाठी महापालिकेने https://pandal.maharts.com/ वेबसाईट तयार केली असून, गणेश मंडळांनी सदर वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत, असे उपायुवत वारुळे यांनी सांगितले.
दरम्यान, गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात त्यांना येणाऱ्या विविध समस्या तसेच गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली.