उरण पूर्व भागात विजेचा खेळखंडोबा

उरण : ‘महावितरण'च्या दुर्लक्षामुळे उरणच्या पूर्व विभागात विजेचा सातत्याने खेळखंडोबा सुरु झाला आहे. याचा नाहक त्रास येथील विद्यार्थी वर्गाला आणि सर्वसामान्य जनतेला बसत असून वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महत्वाचे म्हणजे यावर्षी ७ सप्टेंबर रोजी श्री गणेशोत्सव सुरु होत असून त्यासाठी अवघे २० दिवस शिल्लक राहिले आहेत. पण, सरर खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे चिरनेर कलानगरातील मुर्ती कारागिरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

उरण तालुक्यातील पूर्व भाग विकसित होत चालला असून या भागात विविध कंपन्यांची गोदामे वसली आहेत. यामुळे विजेचा वापरात  मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजेचा वापर वाढत असताना मात्र सर्वसामान्य जनतेची दररोजची वीज गायब होऊ लागली आहे. कोणत्या ना कोणत्या भागामध्ये विजेचे फॉल्ट असल्याच्या कारणावरुन वीज गायब होत आहे.

गेल्या २० दिवसापासून वीज पुरवठा खंडीत होण्याच नित्य नियम सुरु आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तिन्ही वेळेत वीज गायब होत आहे. याचा अर्थ अधिकाऱ्यांचे विजेच्या मेंटनन्स कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे. खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याचा सर्वाधिक फटका उरण तालुक्याच्या पूर्व विभागाला बसत आहे. उरण पूर्व भागात येणारी वीज सुमारे ७० ते ७५ किलोमिटर लांबीवर असलेल्या फिडरवरुन आणली जाते. त्यात संपूर्ण वीजलाईन रस्त्यांच्या कडे-कडेने आलेली आहे. या रस्त्यांवर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्यामुळे रोज कुठेतरी एकतरी वाहन या वीजेच्या खांबांना धडकल्यामुळे वीज खंडीत होत आहे. त्याचप्रमाणे उरण पूर्व भागात सदर वीज वाहिन्यांच्या खाली सर्वत्र भराव झाल्यामुळे वीज वाहिन्या जमिनीलगत खाली आल्या आहेत. एखादे वाहन किंवा काहीतरी अपघात होवून या वीज वाहिन्या तुटल्या जातात. त्यामुळेही वीज पुरवठा खंडीत होतो.

मागील काही दिवसांपासून रात्री-अपरात्री वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचा त्रास विद्यार्थी, नोकरदार, नागरिक, व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. त्यात पावसाळा सुरु असल्याने डासांच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच यंदा ७ सप्टेंबर पासून श्री गणेशोत्सवाला सुरुवात होत असल्याने सध्या चिरनेर कलानगरातील मुर्ती कारागिरांनी मुर्तीं घडविण्याकडे, रंग काम करण्याकडे आपल लक्ष केंद्रित केले आहे. परंतु, सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याचा सामना कलानगरातील मुर्ती कारागिरांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे ‘उरण'चे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर आणि ‘महावितरण'चे अतिरिवत कार्यकारी अभियंता संदीप चाटे यांनी दिघोडे येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या सब-स्टेशनच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी उरण पूर्व विभागातील रहिवाशी करीत आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महापालिका तर्फे गणेशोत्सव नियोजन बैठक