नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
डायघरवासियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा
ठाणे : कल्याण तालुक्यातील डायघर येथील भागात नागरिकांना कचऱ्याच्या समस्येने ग्रासले आहे. याविषयी येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे हत्यारही उपसले होते. मात्र, संवेदनशील जिल्हाधिकारी म्हणून ओळख असलेले ‘ठाणे'चे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी डायघरवासियांच्या या प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह तेथील नागरिकांना १२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित केले होते. यावेळी डायघर परिसरातील कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
सदर बैठकीस ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ‘कल्याण'चे तहसिलदार सचिन शेजाळ, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, डायघरवासिय उपस्थित होते.
बैठकीत आमदार राजू पाटील यांनी डायघर परिसरातील कचरा, तेथील दुर्गंधी, प्रदुषण, आदि समस्यांचा पाढाच वाचला. बहुतांश समस्या या त्या परिसरात साचलेला कचरा, दुर्गंधी, प्रदुषण अन् त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या याबाबतीत होत्या. यावर जिल्हाधिकारी शिनगारे यांनी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना सदर विषय अतिशय गांभीर्याने घेण्याविषयी सूचित केले.
डायघर येथील कचरा डेपो बंद करता येणे शक्य नाही, अशी वस्तुस्थिती आहे. मात्र, येणाऱ्या कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावण्याविषयी काटेकोर नियोजन करावे. कचरा टप्प्याटप्प्याने आणून त्या कचऱ्यावर आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ करावी. लिचड कलेक्शन करावे. या परिसरातील आधीपासून असलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने तातडीने विल्हेवाट लावावी. डायघर येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजनाही तातडीने कराव्यात. येथील नागरिकांना कचऱ्यामुळे अथवा कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होणार नाही, याची पूरेपूर काळजी घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले. तसेच या सर्व बाबींची सविस्तर माहिती ठाणे महापालिका आयुक्त राव यांनाही द्यावी, असेही शिनगारे म्हणाले.
दरम्यान, येथील नागरिकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मुर्त्यांच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचीही मागणी केली. त्यावर सदरची मागणी तात्काळ मान्य करीत ठाणे म्हापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी तेथे कृत्रिम तलावाची लगेचच उभारणी करण्यात येईल, असे आश्वासित केले.
शेवटी जिल्हाधिकारी महोदयांनी डायघरवासियांसाठी तातडीने घेतलेल्या सदर बैठकीबद्दल आ. प्रमोद (राजू) पाटील यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांनी आभार मानले.