कल्याण शहरात खड्ड्यांचे साम्राज्य

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी आक्रमक भूमिका घेतला आहे. मोहन उगले यांनी पत्रकारांसमवेत कल्याण मधील विविध परिसरात फेरफटका मारीत रस्त्यावर पडलेले खड्डे दाखवित महापालिका प्रशासनाची पोल खोल केली आहे. एकीकडे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य असताना दुसरीकडे सदरचे खड्डे बुजविण्यासाठी आणलेली मशीनच मात्र धूळखात पडून असल्याची बाब उगले यांनी उघडकीस आणली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेत लवकरात लवकर खड्डे बुजविण्याची मागणी उगले यांनी केली आहे.

कल्याण शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून कसरत करत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. असे असताना कल्याण पश्चिम मधील अग्निशमन दल मुख्यालय येथे गेल्या महिन्याभरापासून मॅस्टीक पध्दतीने रस्त्यावरील खड्डे डांबरीकरणाने भरण्याचा ठेका दिलेल्या एजन्सीने मशीन दिखाव्यासाठी ठेवल्या आहेत का? असा सवाल उगले यांनी उपस्थित केला आहे. याबाबत उगले यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांची भेट घेतली असता शहरामधील रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण अंत्यत अल्प आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात शहारातील रस्त्यावर खड्डे पडले नसल्याचे परदेशी यांनी सांगितले.

यावर मोहन उगले यांनी आक्रमक होत खड्डे अल्प प्रमाणात पडले आहेत, तर खड्डे भरण्यासाठी २२ कोटी रक्कमेची तरतूद करुन कामे हाती घेतली आहेत. एक महिन्यापासून शासकीय जागेत मशीन पडून आहेत. जर का मशीनने काम करणार नसू तर २२ कोटींचे काम नवकीच नसेल. तर उरलेल्या पैशाचे प्रशासन काय करणार? असा सवालही उगले यांनी प्रशासनाला विचारला आहे. खड्डेमय रस्ते असताना देखील महापालिका अधिकारी बिनधास्तपणे सांगतात खड्डे नाहीत. क-प्रभाग सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांना देखील रस्त्यावर पडलेले खड्डे दाखविले आहेत. आधारवाडी चौकातील रिलायन्स समोरील रस्त्यावरील खड्डा, दुर्गाडी समोरील रस्त्यावरील खड्डे, पवारणीचा पाडा परिसरातील खड्डे, असे ४-५ रस्त्यावरील खड्डे दाखवून देखील माणसे मेली तरच काम करणार का? असा सतंप्त सवाल उगले यांनी उपस्थित केला.

याबाबत प्रशासनाने खुलासा केला पाहिजे. जे पैसे शिल्लक राहणार त्यांचा विनयोग काय करणार? ते जनतेला कळले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यावरील खड्डे प्रश्नी माजी नगरसेवक मोहन उगले यांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर मांडून खड्डे प्रश्नावर महापालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 डायघरवासियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा