नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद
निळजे, निळजेपाडा येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
निळजे गावातील बैठकीत गावकऱ्यांची भूमिका
डोंबिवली : निळजे पाडा आणि निळजे गाव या दोन्ही गावातील आरोग्य केंद्र, २ क्रीडांगणे, स्मशानभूमी, ‘अमृत योजना'तून उभारण्यात येत असलेले पाण्याचे जलकुंभ आदिंवर वरवंटा फिरवला जाणार आहे. १०० एकर हून अधिक गुरचरण जमीन मेट्रो कारशेड साठी संपादित केली जाणार आहे. यावर आपली भूमिका मांडण्यासाठी गावाकऱ्यांची निळजे गावातील ज्येष्ठ नागरिक भवन येथे बैठक पार पडली. यावेळी प्रकल्पाला आमचा विरोध नाही; मुलभूत सुविधांसाठीचे भूखंड सोडून प्रकल्प राबवा अन्यथा आंदोलन करु, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
सर बैठकीस गजानन मांगळूरकर, माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, माजी सरपंच रविंद्र पाटील, प्रकाश पाटील, विश्वनाथ रसाळ यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सार्वजनिक सोयी-सुविधा यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावरील २ क्रीडांगणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी आदि सामाजिक हिताच्या मूलभूत सुविधा असलेल्या १५ एकर भूखंडाची जमीन ग्रामस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनार्थ असल्याने शासनाने मेट्रो प्रकल्पासाठी या जमिनी ताब्यात घेऊ नये. शासनाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही; मात्र गावातील सार्वजनिक नागरी हिताच्या मुलभूत सुविधांचा विचार करुन प्रकल्प राबवावा, असे माजी सरपंच रविंद्र पाटील म्हणाले.
स्वातंत्रोत्तर काळापासून गांवठाण विस्तार करण्यात आला नसतानाही निळजे पाडा आणि निळजे गांव या दोन्ही गावात असलेली शेकडो एकर गुरचरण जमीन ग्रामस्थांनी कोणत्याही अतिक्रमणाशिवाय राखून ठेवली आहे. मागील ७० वर्षाच्या कालावधीत मोकळ्या असलेल्या या गुरचरण जमिनीवर ग्रामस्थांना सहजपणे अतिक्रमण करुन इमारती उभारता आल्या असत्या. मात्र, आम्ही तसे केले नाही. त्यामुळेच आज सदर जमिनीची मोकळी जागा सहजपणे उपलब्ध झाली आहे, असे माजी सरपंच बाळकृष्ण पाटील यांनी सांगितले.
‘एमएमआरडीए'च्या मेट्रो-१२ प्रकल्पाच्या मेट्रो यार्ड कारशेडसाठी निळजे आणि निळजेपाडा या दोन्ही गावाच्या हद्दीतील सुमारे १०० एकर गुरुचरण जमीन शासनाने ‘एमएमआरडीए'ला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ‘मेट्रो यार्ड'साठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीवर सद्यस्थितीला या भूखंडावर २ क्रीडांगण, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, पाण्याच्या टाक्या, आदि नागरी सुविधा असल्याने त्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पात बाधित होणार आहे. क्रीडांगणे आणि सार्वजनिक आरोग्य केंद्राची उभारणी ग्रामपंचायत मध्ये ठराव करुन केली असून त्याला शासनाचा विविध निधी उपलब्ध केलेला आहे . ग्रामस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेले २ क्रीडांगण, सार्वजनिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी असलेल्या जमिनी सार्वजनिक नागरी हिताच्या सुविधांकरिता असल्याने सदरच्या वास्तू असलेल्या १५ एकर जमीन राखून ठेवण्यात यावी. शासनाने मेट्रो प्रकल्पासाठी सदर जमिनी ताब्यात घेऊ नये, अशी मागणी करण्यात आल्याचे गजानन मांगळूरकर यांनी सांगितले.
निळजे आणि निळजेपाडा या दोन्ही गावाच्या हद्दीतील जमिनीत उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेड पासून २ ते २.५ किलोमीटर अंतरावर मेट्रो स्टेशन असणार आहे. त्यामुळे आमची जमिनी घेऊनही आम्हा गावकऱ्यांना ‘मेट्रो स्टेशन'चा काहीही उपयोग होणार नाही, अशा भावना बैठकीत ग्रामस्थांनी बोलून दाखविल्या.
राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या म्हाडा, गिरणी कामगारांना घरे, मेट्रो यासारख्या विविध प्रकल्पासाठी कल्याण ग्रामीण मधील भूखंड ताब्यात घेतले जात असल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. हेदुटणे-उसरघर येथे गिरणी कामगारांसाठी घरांच्या आरक्षण विरोधात आंदोलन छेडले गेल्यानंतर आता निळजे, निळजेपाडा येथील ग्रामस्थ देखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. ग्रामस्थांच्या मुलभूत सुविधांसाठीचा भूखंड सोडून प्रकल्प राबवला जावा. जर ग्रामस्थांच्या मुलभूत सुविधांवर गदा आणल्यास आंदोलन करु, असा इशारा देखील ग्रामस्थांनी शासनाला दिला आहे.