पनवेल महापालिका तर्फे तिरंगा मॅरेथॉन

पनवेल : महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ऑगस्ट रोजी पनवेल महापालिका तर्फे ‘घरोघरी तिरंगा' या उपक्रमांतर्गत तिरंगा सन्मानार्थ ‘तिरंगा मॅरेथॉन' काढण्यात आली. ‘भारत माता की जय', ‘वंदे मातरम्‌'च्या घोषणा देत महापालिका मुख्यालय ते वडाळे तलाव पर्यंत ‘तिरंगा मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले.

केंद्र शासनाच्या ‘घरोघरी तिरंगा' उपक्रम अंतर्गत ११ ऑगस्ट रोजी उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या नेतृत्वाखाली ‘तिरंगा मॅरेथॉन' आयोजित करण्यात आली. यामध्ये सुमारे ४०० हून अधिक विद्यार्थी, नागरिक,  महापालिका अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा विभाग आणि स्वच्छतादूत यांनी सहभाग घेतला. मॅरेथॉन पनवेल महापालिका कार्यालय- जय भारत नाका-स्वातंत्र्यवीर सावरकर चौक-बल्लाळेश्वर मंदिर-के. वि. कन्या शाळा या मार्गे जाऊन शेवटी वडाळे तलाव येथे ‘मॅरेथॉन'ची सांगता झाली.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिन निमित्त शासन निर्देशानुसार ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये महापालिका कार्यक्षेत्रात ‘घरोघरी तिरंगा' उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत १२ ते १४ ऑगस्ट रोजी बचतगटामार्फत ‘तिरंगा मेला'चे आयोजन तर १३ ऑगस्ट  रोजी ‘ऐ वतन तेरे लिये' या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ऑगस्ट रोजी तिरंगा सन्मानार्थ बाईक आणि सायकल तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवावा. त्यासोबतचे स्वतःचे सेल्फी काढून  www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावे. महापालिका तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा' उपक्रमात  नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 निळजे, निळजेपाडा येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात