‘नमुंमपा'तर्फे २ आठवड्यात २ हजारहून अधिक पाणी नमुन्यांची तपासणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका तर्फे नागरिकांना करण्यात येणारा पाणी पुरवठा स्वच्छ आणि शुध्द असावा यादृष्टीने बेलापूर ते दिघा विभागातील विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनीवरुन दररोज ११ पाणी नमुने घेऊन त्यांची गुणवत्ता तपासणी पाणीपुरवठा विभागामार्फत नियमित करण्यात येत असते.

त्यामध्ये पावसाळी कालावधी म्हणून लक्षणीय वाढ करावी आणि मोठ्या प्रमाणात पाणी नमुने तपासावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि त्यांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी नियोजन करीत रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष मोहीम मागील ४ ऑगस्ट रोजी राबविली. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी पुन्हा एकवार संपूर्ण महापालिका क्षेत्रात सदर विशेष मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही वेळेस नेहमीपेक्षा १० पट अधिक म्हणजे प्रत्येक रविवारी १ हजाराहून अधिक म्हणजे लागोपाठ दोन रविवारी २ हजारपेक्षा अधिक पाणी नमुने वेगवेगळ्या ठिकाणाहून तपासण्यात आले.

यामध्ये महापालिका क्षेत्रातील घरे, सोसायट्या, गांवठाण आणि झोपडपट्टी भाग, वाणिज्य संकुले, शैक्षणिक तसेच इतर संस्था अशा विविध ठिकाणांहून तसेच मुख्य जलवाहिनी, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, जलकुंभ अशा ठिकाणांवरुनही पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात आली.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांना उत्तम गुणवत्तेचा स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. याद्वारे पाण्याची गुणवत्ता लक्षात येत असून ४ ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आलेल्या १०२१ नमुन्यांपैकी ९५ टक्के नमुने उत्तम असल्याचे आढळून आले असून आवश्यक त्या ठिकाणी क्लोरिनची मात्रा वाढवून जलशुध्दतेत सुधारणा केली जात आहे. महत्वाचे म्हणजे नमुना संख्येत लक्षणीय वाढ केल्याने अधिक बारकाईने पाणी गुणवत्ता लक्षात येत असून त्यानुसार आवश्यक सुधारणा करणे शक्य होत असल्याची माहिती अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महापालिका तर्फे तिरंगा मॅरेथॉन